Pune News – टँकर वेल्डिंग करताना भीषण स्फोट, एक कामगार गंभीर जखमी
टँकर वेल्डिंग करताना स्फोट झाल्याने एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गालगत माळी मळा परिसरात मंगळवारी सकाळी ही घटना घडली. जखमी कामगाराला पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चांद बाबू असे जखमी कामगाराचे नाव आहे. स्फोट इतका भीषण होता की काही अंतरावर आवाज ऐकू गेला. दुकानाचे पत्र्याचे शेडही तुटले.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोणी काळभोर हद्दीतील माळी मळा परिसरात भारत वेल्डिंग वर्क्स या वर्कशॉपमध्ये टँकरच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. काम सुरू असतानाच टँकरच्या टाकीत असलेल्या गॅसमुळे अचानक मोठा स्फोट झाला. यात या चांद बाबू हा कामगार गंभीर भाजला. स्फोटानंतर तो शेडखाली अडकला होता. त्याला बाहेर काढून तातडीने पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.
संबंधित टँकरचा वापर पेट्रोल व डिझेल वाहतुकीसाठी केला जात होता. टाकीत उरलेल्या ज्वलनशील वायूंच्या साठ्यामुळे वेल्डिंगदरम्यान ठिणगी पडून स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
Comments are closed.