Jamkhed news – मुलीच्या लग्नाचा बस्ता घेऊन घरी निघालेल्या वडिलांवर काळाचा घाला
मुलीच्या लग्नामुळे घरात आनंदाचे वातावरण असतानाच वडिलांवर काळाने घाला घातला. मुलीच्या लग्नाचा बस्ता बांधून दुचाकीवरून घरी परतत असताना समोरून येणाऱया भरधाव दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत पित्याचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना खर्डा गावापासून जवळच घडली.
महादेव लक्ष्मण फरताडे (वय 45, रा. गोसावीवाडी, ता. परंडा, जि. धाराशिव) असे अपघातात मृत्यू झालेल्या पित्याचे नाव आहे.
महादेव फरताडे यांच्या मुलीचे 7 मे 2026 रोजी लग्न निश्चित झाले होते. लग्नासाठी कपडय़ांचा बस्ता बांधण्यासाठी ते खर्डा येथे आले होते. बस्ता बांधून झाल्यानंतर दुचाकीवरून ते नातेवाईक अभिषेक चव्हाण यांच्यासह भूममार्गे गावाकडे निघाले होते. खर्डा गावापासून काही अंतरावर समोरून येणाऱया एका अज्ञात दुचाकीचालकाने फरताडे यांच्या गाडीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, महादेव फरताडे हे हवेत उंच उडून थेट रस्त्यावर डोक्यावर आदळले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
धडक दिल्यानंतर अज्ञात दुचाकीचालक घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी अभिषेक चव्हाण (वय 18, रा. वंजारवाडी, ता. जि.बीड) यांनी खर्डा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अंमलदार आर. डी. नागरगोजे यांनी अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला. खर्डा स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संभाजी शेंडे तपास करत आहेत. दरम्यान, अवघ्या दोन दिवसांवर मुलीचे लग्न आले असताना, वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्याने फरताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Comments are closed.