IPL 2026 – हैदराबादचा पहिला नंबर; पंजाबचा उडवला धुव्वा, कूपर कोनोलीचे घणाघाती शतक व्यर्थ
सलग सात सामने अपराजित असलेल्या श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा सनरायझर्स हैदराबादने पराभव केला.आणि हैदराबादने त्यांचे अव्वल स्थान हिसकावून घेण्याचा पराक्रम केला. आता हैदराबादने 14 गुणांसह गुणतालिकेत पहिला नंबर पटकावला आहे. त्यांच्या 236 धावांच्या आव्हानाचा पाठलाग पंजाबला झेपलाच नाही. कूपर कोनोलीने नाबाद अन् 107 धावांची खेळी साकारत पंजाबच्या पराभवाचे अंतर कमी केले. अन्य पाच फलंदाजांप्रमाणे कोनोलीची शतकी झुंज व्यर्थ गेली.
हैदराबादने उभारलेला 4 बाद 235 धावांचा डोंगर सुपर फॉर्मात असलेला पंजाब सहज चढेल, असा बांधलेला अंदाज खोटा ठरला. पंजाबचे वादळ प्रियांश आर्यला कर्णधार पॅट कमिन्सने पहिल्याच षटकांत बाद करून सनसनाटी सुरुवात केली. पाठोपाठ प्रभसिमरन सिंग हा 4 धावांतच बाद झाल्यामुळे पंजाब हादरला. त्यानंतर कूपर कोनोलीने एक बाजू लावून धरत पंजाबच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला, पण दुसऱ्या बाजूने श्रेयस अय्यर (5), मार्पस स्टॉयनिस (28) यांची विकेट काढण्यात हैदराबादच्या गोलंदाजांना यश लाभले. गेल्या सामन्यात 57 धावांची खेळी सूर्यांश शेडगेही (25) फार काळ तग धरू शकला नाही. पाठोपाठ शशांक सिंगचीही विकेट काढली. परिणामतः 119 धावांतच 6 विकेट गमावत पंजाबने हार मानली होती. 7 षटकांत 115 धावांचा पाठलाग करणे पंजाबला कठीण होते, पण कोनोलीने मनसोक्त फटकेबाजी करत पंजाबला दोनशेचा टप्पा गाठून देत हार मानली. कोनोलीने 59 चेंडूंत 8 षटकार आणि 7 चौकार खेचले. 2 विकेट आणि 2 अप्रतिम झेल टिपणारा कमिन्स ‘सामनावीर’ ठरला.
किशन–क्लासनचा वर्ग
इशान किशन आणि हेन्रीक क्लासन यांनी आपला झंझावाती क्लास पुन्हा दाखवला. अभिषेक शर्मा (35) आणि ट्रव्हिस हेड (38) यांनी तीन षटकांतच पन्नाशी गाठली. दोघांच्या हवाई हल्ल्यांनी पंजाबची गोलंदाजी अक्षरशः ढेपाळली. मग हेडही नवव्या षटकात बाद झाला. मात्र त्यानंतर किशन आणि क्लासनने हैदरबादच्या मारा पह्डून काढला. दोघांनी 8 षटकांत 88 धावांची भागी रचली. मग नितीश रेड्डीच्या 29 धावांनी हैदराबाद 235 पर्यंत नेले. किशनने 32 चेंडूंत 55 तर क्लासनने 43 चेंडूंत 69 धावा काढल्यामुळे हैदराबादला 235 ही आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.
आणखी एक शतक वाया
कोनोलीचे शतक यंदाच्या आयपीएलमधील दहावे शतक ठरले. दुर्दैवाची बाब म्हणजे दहापैकी सहावे शतक अपयशी ठरले. शतक ठोपूनही कोनोलीचा संघ हरला. याआधी गेल्या 48 सामन्यांत मुंबईच्या क्विंटन डिकॉक, रायन रिकल्टन, दिल्लीच्या के. एल. राहुल, गुजरातच्या साई सुदर्शन आणि राजस्थानच्या वैभव सूर्यवंशी यांच्या घणाघाती शतकी खेळय़ा संघाला विजय मिळवून देण्यात कमी पडल्या होत्या. म्हणजे दहापैकी चारच शतकी खेळय़ा संघांना विजय मिळवून देणाऱ्या ठरल्या आहेत.
Comments are closed.