राज्यातल्या 1600 गावांची तहान टँकरच्या पाण्यावर, टँकरच्या मागणीचा वाढता आलेख
उन्हाच्या तीव्र झळांमुळे राज्यातल्या धरणांमधील पाणीसाठा एकीकडे झपाटय़ाने खालावत चालला आहे, तर दुसरीकडे राज्यातील टँकरची संख्या झपाटय़ाने वाढत असून राज्यातील सुमारे 1600 गावे आणि वाडय़ांची तहान सध्या 466 टँकरच्या पाण्यावर तहान भागवली जात आहे.
राज्याच्या बहुतांश भागांत उष्णतेची लाट पसरली आहे. राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने राज्यातल्या कोणत्या भागात किती पाणीटंचाई आहे याचा आढावा घेतला. तेव्हा बारा जिह्याच्या पाणीटंचाईचा मोठा फटका बसल्याचे लक्षात आले. राज्यातील 411 गावे आणि 1 हजार 194 गावांची तहान टँकरच्या पाण्यावर भागवली जात असल्याचे लक्षात आले. पाणीटंचाईचे सावट असल्याने टँकरची संख्या वाढत आहे. एप्रिलच्या चौथ्या आठवडय़ात 321 टँकर धावत होते, पण या आठवडय़ात टँकरची संख्या एकदम 466 वर गेली आहे. सर्वाधिक म्हणजे 138 टँकर संभाजीनगरमध्ये पाणीपुरवठा करीत आहेत. त्याखालोखाल नाशिकमध्ये 83 टँकर वाडय़ा-वस्त्यांना पाणीपुरवठा करीत आहेत. ठाणे-32, रायगड-50, रत्नागिरी-18, पालघर-28, पुणे-37 आणि साताऱयात 41 टँकर सध्या पाणीपुरवठा करीत आहेत.
राज्यातल्या धरणातील पाणीसाठाही झपाटय़ाने खालावत आहे. सध्याच्या घडीला राज्यातल्या सुमारे तीन हजार धरणांमधील पाणीसाठा 37.37 टक्क्यांवर आला आहे. राज्यातील वीजनिर्मितीची मुख्य भिस्त असलेल्या साताऱयातील कोयना धरणातील पाणीसाठा फक्त 25.72 टक्क्यांवर आला आहे.
Comments are closed.