लवांडेंच्या केसाला जरी धक्का लागला तर..; रोहित पवार पोलीस ठाण्यात, शाईफेकीच्या घटनेवरुन इशारा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे (Vikas lawande) यांच्यावर आज शाईफेक करण्यात आली. वारकरी आणि हभप म्हणणाऱ्या संग्राम भंडारे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी लवांडे यांना एका ठिकाणी गाठून त्यांच्या अंगावर काळी शाई ओतली. मात्र, मला ठार मारण्याचा प्रयत्न होता, संग्राम भंडारेंकडे पिस्तुल होतं, त्याचा धाकही मला दाखवल्याचं विकास लवांडे यांचं म्हणणं आहे. याप्रकरणी, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, याप्रकरणात, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विकास लवांडे यांनी केलीय. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही पोलीस ठाण्यात जाऊन कलम वाढवण्याची मागणी केलीय. तसेच, आमच्या मागणीनुसार कलम वाढवण्यात न आल्यास सोलापूर हायवेवर रास्तारोको आंदोलन करणार असल्याचा इशाराही रोहित पवार यांनी दिलाय.

विकास लवांडे यांच्यावरील हल्लाप्रकरणात गुन्हा दाखल झालाय पण खुनाचा प्रयत्न हे कलम लावलेलं नाही. आम्ही दोन दिवसात चौकशी करून अधिकची माहिती देतो. जर आमच्या मागणीनुसार कलम नाही लागलं तर आम्ही दोन दिवसांनी सोलापुर हायवेवर रास्तारोको करू, असा इशाराच रोहित पवार यांनी दिली. तसेच, हा हल्लेखोर भोंदू स्वत:ला महाराज म्हणवतो मग शिव्या कशा देतो? वारकरी सांप्रदायतले हे घुसखोर जे आहेत त्यांच्या विरोधात आमचा लढा सुरूच राहणार, आम्ही पोलिसांना तपासासाठी दोन दिवस देतो, नंतर मग आम्ही गप्प बसणार नाही, असेही रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. तसेच, ट्विट करुन देखील त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

आर्म अॅक्टचा गुन्हा नाही, पोलिसांवर दबाव

फेसबुक पोस्टवर रोहित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे आणि त्याच्या गुंडांनी केलेला हल्ला आणि शाईफेकीसंदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पोलिसांची भेट घेतली. लवांडे यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली तरीही दबावाखाली असलेल्या पोलीस प्रशासनाने यासंदर्भातील आर्म ॲक्ट नुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. यावरुन पोलिसांवर किती दबाव आहे हेच दिसून येतं. असं असेल तर या गुन्ह्याचा तपास खरंच पारदर्शक पद्धतीने होईल का आणि भर दिवसा कायद्याला न जुमानता मस्ती करणाऱ्या गुंडांविरोधात कारवाई होईल का, याविषयी आमच्या मनात शंका आहे. पण या गुन्ह्याच्या तपासाकडं आमचं लक्ष राहिल, असे म्हणत रोहित पवार यांनी याप्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली.

लवांडे यांच्या केसालाही धक्का लागला तर…

विकास लवांडे यांच्या केसालाही धक्का लागला तर त्याची पूर्ण जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची राहील, याची सरकारने नोंद घ्यावी. या हल्ल्याच्या निमित्ताने एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे दुसऱ्या राज्यातून येऊन अनेक भोंदूबाबा जगद्गुरु संत तुकाराम महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चुकीचं आणि आक्षेपार्ह बोलतात त्यावेळी हे भोंदू मूग गिळून बिळात लपून बसतात. आजच्या हल्ल्याने बंधूभाव, शांतता आणि समता प्रस्थापित करणाऱ्या वारकरी संप्रदायात स्वतःला वारकरी म्हणून घेणाऱ्या कट्टरतावादी गुंडांनी घुसखोरीच केली, हे सिद्ध झालं. त्यामुळं भविष्यात संतांचा खरा विचार जपण्यासाठी या घुसखोरांविरोधात संघर्ष करण्याची वेळ आली, हे सर्वांनीच लक्षात घेण्याची गरज आहे.

हेही वाचा

शाईफेक प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करताच संग्राम भंडारेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, ‘विकास लवांडे पिस्तुल लावण्याच्या पात्रतेचा नाही’

आणखी वाचा

Comments are closed.