सिडकोचा बुलडोझर सुसाट; दोन वर्षांत ५ हजार ८०४ अनधिकृत इमले पाडले, ११० हेक्टर क्षेत्रावरून भूमाफियांना हुसकावून लावले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नवी मुंबई शहरात विजेच्या वेगाने वाढलेली अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यासाठी सिडकोच्या अतिक्रमण विभागाचा बुलडोझर सुसाट निघाला आहे. अतिक्रमण विभागाने गेल्या दोन वर्षांत ५ हजार ८०४ अनधिकृत इमारतींवर हातोडा चालवला असून ११० हेक्टर क्षेत्रावरून भूमाफियांना हुसकावून लावले आहे. सिडकोने अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने अनधिकृत बांधकामवाल्यांचे धाबे दणाणले आहे.

सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारीपदाची धुरा सुरेश मेंगडे यांच्या खांद्यावर आल्यानंतर बेकायदा बांधकामावरील कारवायांचा वेग कमालीचा वाढला आहे. दोन वर्षांत सिडकोने नवी मुंबई, पनवेल महापालिका क्षेत्रांसह नैना क्षेत्रांमध्ये मोठ्या संख्येने अतिक्रमणे हटवली आहेत. मागील दोन वर्षांत सिडकोने ११० हेक्टर जमिनीवरील ५,८०४ अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे यशस्वीरित्या निष्कासित करून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणमुक्त केली आहेत.

गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत नवी मुंबई परिसरातील अनधिकृत बांधकामधारकांना मोठ्या प्रमाणावर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यापैकी मोठ्या संख्येने बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. दरम्यान, अनधिकृत बांधकामांविरोधात सुरू करण्यात आलेली मोहीम यापुढेही अशीच सुरू ठेवण्यात येणार आहे, असा इशाराही सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिला आहे.

शहराच्या विकासासाठी सिडको कटिबद्ध

नवी मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी सिडको कटिबद्ध आहे. अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधात राबविण्यात आलेली व्यापक कारवाई ही बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधातील सिडकोची ठाम भूमिका अधोरेखित करते. अतिक्रमणमुक्त करण्यात आलेली ही जमीन केवळ आकाराने जास्त नसून एरोसिटी, एज्युकेशन सिटी, मेडिसिटी, लॉजिस्टिक पार्क, एंटरटेन्मेंट अरेना आदी महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या उभारणीच्या दृष्टीने उपलब्ध झालेली संधी आहे, अशी प्रतिक्रिया सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी व्यक्त केली आहे.

Comments are closed.