12 वर्षांखालील व्हेरॉक करंडक क्रिकेट स्पर्धा – वेरॉक वेंगसरकर अ‍ॅकॅडमीला विजेतेपद, अंतिम लढतीत ट्रिनिटी संघाचा धुव्वा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

प्रत्युष उघडेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीने अंतिम लढतीत ट्रिनिटी क्रिकेट अॅकॅडमीचा ९ गडी राखून धुव्वा उडवित १२ वर्षांखालील व्हेरॉक करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अष्टपैलू कामगिरी करणारा प्रत्युष उघडे या विजयाचा शिल्पकार ठरला. याचबरोबर स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज व मालिकावीराचा बहुमानही प्रत्युषलाच मिळाला, हे विशेष.

व्हेरॉक क्रिकेट मैदानावर झालेल्या या अंतिम सामन्यात ट्रिनिटी क्रिकेट अ‍ॅकॅडमीने प्रथम फलंदाजी करत ४० षटकांत ८ बाद १७३ धावा केल्या. संघाकडून आरव देशमुखने ३६, हर्षदीप सिंगने ३५, शौर्य जाधवने २९ आणि विहान जाधवने २२ धावांचे योगदान दिले. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीकडून प्रत्युष उघडेने प्रभावी गोलंदाजी करत ८ षटकांत ३९ धावा देत २ बळी घेतले. अर्णव बेंडभार आणि धैर्य यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत मोलाची साथ दिली.

मिळालेले १७४ धावांचे लक्ष्य वेंगसरकर अॅकॅडमीने २८.५ षटकांत केवळ एका फलंदाजाच्या मोबदल्यात १७५ धावा करीत सहज पूर्ण केले. प्रत्युष उघडेने शानदार ७९ धावांची खेळी करत विजयाचा पाया रचला. प्रिन्स खलाटेने ७४ धावांचे योगदान दिले, तर सूर्य नारायणने १५ धावा जोडल्या. ट्रिनिटी संघाकडून आरव पाटीलने एकमेव बळी टिपला.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभहिंदुस्थानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रशिक्षक शादाब शेख, चंदन गंगावणे, प्रमोद लिमण, भूषण सूर्यवंशी, महेश आवटे आणि डॉ. विजय पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय पाटील यांनी केले.

वैयक्तिक बक्षिसांचे मानकरी

उत्कृष्ट फलंदाज : प्रत्युष उघडे
उत्कृष्ट गोलंदाज :
श्लोक येरुणकर
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक:
यशवर्धन आजबे
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : प्रत्युष उघडे

Comments are closed.