२४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधानांचे आवाहन.
सोने खरेदीची गरज नाही, ऑनलाइन क्लासेस करा, सोने खरेदीची गरज नाही, ऑनलाइन क्लासेस करा
वृत्तसंस्था/ बडोदा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या बडोदा येथील सरदारधाम वसतिगृहाच्या उद्घाटनावेळी 24 तासांत दुसऱ्यांदा जागतिक संकटाचा उल्लेख केला. गेल्या काही वर्षांपासून जग सतत अस्थिरतेचा सामना करत आहे. आधी कोविड-19 चे संकट, त्यानंतर जागतिक आर्थिक आव्हाने आणि आता पश्चिम आशियातील वाढता तणावाचा संपूर्ण जगावर सतत परिणाम होत आहे. भारतही त्याला अपवाद नाही, असे मोदी म्हणाले. या संकटामुळे आपल्याला काही बाबी कटाक्षाने टाळाव्या लागतील असे सांगत तेल, पेट्रोल, डिझेल वाचवण्याचा सल्ला दिला. तसेच तूर्तास सोने खरेदी न करण्याचे आणि ऑनलाईन क्लासेस सुरू करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
देशातील प्रत्येक नागरिकाने पेट्रोल आणि डिझेलचा वापर शक्य तितका कमी करावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले. मेट्रो, इलेक्ट्रिक बस आणि सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करा. कारपूलिंगला प्रोत्साहन द्या. ज्यांच्याकडे कार आहेत त्यांनी एका वाहनात अधिक लोकांना घेऊन जावे. डिजिटल तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी इतक्या सोप्या केल्या आहेत की त्याची मदतही आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. शासकीय आणि खासगी दोन्ही कार्यालयांमध्ये व्हर्च्युअल बैठका आणि वर्क फ्रॉम होम करण्यास प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती हे मोठे संकट
जर कोविड-19 महामारी हे या शतकातील सर्वात मोठे संकट होते, तर पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती हे या दशकातील सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे. एकदा आपण सर्वांनी मिळून कोविड-19 चा सामना केला. आता आपण या संकटावरही नक्कीच मात करू. सरकार देशातील लोकांवर होणारा त्याचा परिणाम कमी करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र, लोकांनी साथ देणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मोदी म्हणाले.
परिस्थिती सामान्य होईपर्यंत सोन्याची खरेदी पुढे ढकला
देशातील प्रचंड पैसा सोन्याच्या आयातीमुळे परदेशात जातो. त्यामुळे, मी तुम्हा सर्वांना, माझ्या देशबांधवांना आवाहन करतो की, परिस्थिती सामान्य होईपर्यंत सोन्याची खरेदी पुढे ढकला. आजच्या घडीला ‘व्होकल फॉर लोकल’ (स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन) ही एक जनआंदोलन बनवण्याची गरज आहे. परदेशी वस्तूंऐवजी स्थानिक उत्पादनांचा अवलंब करा. तुमच्या गावातील, तुमच्या शहरातील, तुमच्या देशातील उद्योजकांना सक्षम करा, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
Comments are closed.