कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रादेशिक चित्रपटांचा डंका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेला कान्स चित्रपट महोत्सव सुरू झाला आहे. हिंदुस्थानी सिनेसृष्टीसाठी हा महोत्सव “सुवर्णकाळ” ठरला आहे. १२ ते २३ मे दरम्यान होणाऱ्या कान्सच्या ७९ व्या फेस्टिव्हलमध्ये  केवळ हिंदीतील नाही तर इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटही ठळकपणे दिसून येत आहेत. यामध्ये पंजाबी, मल्याळम, गुजराती आणि कन्नड अशा विविध प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांचा समावेश आहे.

या वर्षीचा कान्स पंजाबी चित्रपटप्रेमींसाठी एक विशेष काळ आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि गायक अॅमी विर्क आणि रूपी गिल यांचा ‘चड्डी कला’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. एका नर्सच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट असून, एका खोट्या आरोपामुळे तिचे आयुष्य कसे कलाटणी घेते हे या चित्रपटामध्ये पाहायला मिळेल. कान्स नंतर हा चित्रपट २९ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.

‘मंजुम्मेल बॉईज’च्या प्रचंड यशानंतर, दिग्दर्शक चिदंबरम आपला नवीन चित्रपट ‘बालन: द बॉय’ घेऊन कान्समध्ये दाखल झाले आहेत. हा चित्रपट ‘मार्शे दु फिल्म’ विभागात प्रदर्शित केला जाईल. जितू माधवन यांनी लिहिलेली ही कथा, स्वतःची ओळख शोधण्यासाठी संघर्ष करणाऱ्या बालन नावाच्या एका लहान मुलाभोवती फिरते. या चित्रपटाच्या माध्यमातून आई-मुलाचे गुंतागुंतीचे नाते आणि मानवी भावनांचे बारकाईने चित्रण केलेले आहे.

कान्सचा ‘ला सिनेफ’ विभाग उदयोन्मुख प्रतिभेसाठी ओळखला जातो आणि यावेळी एफटीआयआयची विद्यार्थिनी मेहेर मल्होत्रा ​​हिचा ‘परचवे मस्या रातन दे’ हा लघुपट चमकणार आहे. तसेच भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज जॉन अब्राहम यांचा कल्ट क्लासिक चित्रपट “अम्मा अरियान” (१९८६) पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर उपलब्ध झाला आहे. हा चित्रपट ४ के मध्ये पुनर्स्थापित (रिस्टोअर) करण्यात आला असून कान्स क्लासिक्ससाठी त्याची निवड झाली आहे. त्याचबरोबर श्रीमयी चक्रवर्ती यांचा “स्पिरिट ऑफ द वाइल्डफ्लॉवर” हा माहितीपट महुआची दारूभट्टी चालवणाऱ्या दोन बहिणींची कथा आहे. सामाजिक रूढी आणि वैयक्तिक स्वप्ने यांच्यातील संघर्षाचा वेध घेणारा हा माहितीपट फिल्म मार्केट विभागात प्रदर्शित होणार आहे.

दिग्दर्शक कॅरेन क्षिती सुवर्णा यांचा सप्टेंबर २१’ या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर १६ मे रोजी कान्स येथील पॅलेस थिएटरमध्ये होणार आहे. हा हिंदी आणि कन्नड भाषेतील चित्रपट अल्झायमरने ग्रस्त असलेल्या एका वृद्ध व्यक्तीचे आणि त्याच्या मुलाच्या नातेसंबंधावर आधारीत आहे. या यादीतील शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा चित्रपट आहे ‘लालो – कृष्णा सदा सहायते’. अंकित सखिया दिग्दर्शित या गुजराती चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर आधीच इतिहास रचला आहे. केवळ ५० लाख रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात १२२ कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता या चित्रपटाला कान्समध्ये एक विशेष मार्केट प्रीमियर देण्यात आला आहे.

Comments are closed.