कोण आहे माधव तिवारी? अष्टपैलू कामगिरी करत पंजाब किंग्जच्या हातून हिसकावला विजय, माजी भारतीय खेळाडूचे लाभले मार्गदर्शन!
आयपीएल २०२६ मध्ये अनेक युवा भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. या स्पर्धेच्या ५५ व्या सामन्यात जो धर्मशालामध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा खेळला गेला. या दोन्ही संघांमध्ये पुन्हा एकदा धावांचा पाऊस झाला. जेथे मिचेल स्टार्क आणि लुंगी एन्गिडी यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू पंजाबच्या फलंदाजांना रोखण्यात अपयशी ठरले तेथे माधव तिवारीने उल्लेखनीय कामगिरी केली.
वेगवान गोलंदाज माधवचा हा या हंगामातील पहिला आणि त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील दुसराच सामना होता. यामध्ये त्याने अष्टपैलू कामगिरी करत दिल्लीच्या विजयात महत्त्वाची भुमिका बजावली. प्रथम त्याने पूर्ण ४ षटके टाकली. त्यामध्ये त्याने ४० धावा देत प्रियांश आर्य आणि कूपर कॉनोली यांच्या विकेट्स घेतल्या. नंतर लक्ष्याचा पाठलाग करताना ८ चेंडूंत नाबाद १८ धावा केल्या. त्याला या कामगिरीसाठी कोणाचे मार्गदर्शन लाभले ते जाणून घेऊ.
माधवचा जन्म मध्य प्रदेशातील मउगंज या गावात २८ सप्टेंबर, २००३ मध्ये झाला. त्याला सुरूवातीला केवळ फलंदाजीच आवडायची, कारण गोलंदाजी थकवणारी असल्याने तो त्याच्यापासून दूर होता. नंतर त्याच्यातील क्षमता प्रशिक्षकाने ओळखली आणि त्याला परिपूर्ण क्रिकेटपटू बनण्यास मदत केली. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू अमाय खुरासियाने माधवला मदत केली.
खुरासिया हे देखील मध्य प्रदेशचेच असून त्यांनी १९९९ मध्ये भारतासाठी १२ वनडे सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांनी १३.५४ च्या सरासरीने १४९ धावा केल्या. ते २००७ मध्ये क्रिकेटमधून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी प्रशिक्षण आणि समालोचन केले.
माधवने अद्यापही वरिष्ठ स्तरावरील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये एकही सामना खेळला नाही. मात्र त्याने आयपीएल पदार्पण केले. त्याला दिल्लीने आयपीएल २०२५ साठी ४० लाख रुपयांना करारबद्ध केले होते. तेव्हा त्याने केवळ एकच सामना खेळला होता, जो मुंबई इंडियन्स विरुद्ध होता. तेव्हा त्याला गोलंदाजीची संधी मिळाली नाही. आता या हंगामात पुन्हा एकदा फ्रॅंचायजीने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांनी तो सार्थ ठरवला.
माधवने १९ वर्षांखालील आणि २३ वर्षांखालील स्तरावर मध्ये प्रदेशचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने २०२४-२५ च्या सीके नायडू ट्रॉफीमध्ये खेळला असून त्यामध्ये त्याने दोन अर्धशतके केली होती. तसेच त्याने मध्य प्रदेश टी२० लीगमध्ये भोपाळ लेपर्ड्स संघाकडून खेळताना प्रभावी कामगिरी केली होती. या स्पर्धेच्या ५ सामन्यांत त्याने १८० च्या स्ट्राईक रेटने १०८ धावा केल्या होत्या. उपांत्य सामन्यात त्याने रेव्हा जग्वार्सविरुद्ध ३१ चेंडूंत ६५ धावांची स्फोटक खेळी करत संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यात मदत केली होती.
आता माधवने त्याच्या दुसऱ्याच आयपीएल सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे दिल्लीच्या आयपीएलच्या या १९ व्या हंगामाच्या प्लेऑफ्सच्या अपेक्षा अजूनही जिवंत आहेत.
पंजाबविरुद्ध स्टार्कने ४ षटकांत ५७ धावा देत मार्कस स्टॉयनिस आणि शशांक सिंग यांना बाद केले. दुसरीकडे एन्गिडीने ४ षटकांत ४६ धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही.
Comments are closed.