अक्षर पटेलला बीसीसीआयचा मोठा धक्का! विजयानंतरही ठोठावला लाखोंचा दंड!
आयपीएल २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सविरुद्ध मोठा विजय मिळवला. आयपीएल २०२६ मध्ये अक्षर पटेलच्या नेतृत्त्वाखाली दिल्ली संघाने दमदार सुरुवात केली होती, परंतु सलग पराभवांमुळे ते प्लेऑफच्या शर्यतीत मागे पडले. दिल्ली कॅपिटल्ससाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा असणार आहे आणि त्यांनी पंजाब किंग्सला हरवून आपल्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.पण पंजाबविरूद्ध सामन्यानंतर अक्षर पटेलला दंड ठोठावण्यात आला.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलला आयपीएलमध्ये अखेरीस सूर गवसला आणि संघासाठी त्याने महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. अक्षर पटेलने या अर्धशतकी खेळीच्या बळावर संघाच्या विजयाचा पाया रचला. अक्षरने या सामन्यात ३० चेंडूत ८ चौकार व २ षटकारांसह ५६ धावांची खेळी केली. शिवाय अक्षर पटेलचं नेतृत्त्वदेखील या सामन्यात कमालीचं ठरलं, ज्यामुळे पंजाब किंग्सचा संघ फार मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलला बीसीसीआयने १२ लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान स्लो ओव्हर रेटमुळे त्याला हा दंड आकारण्यात आला आहे.
सामन्यादरम्यान, संघाला आपली २० षटके निर्धारित वेळेत पूर्ण करावी लागतात. कोणताही विलंब झाल्यास सामनाधिकारी दंड आकारतात. खरं तर, धरमशालामध्ये पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात, अक्षर पटेलने पाच वेगवान गोलंदाजांना मैदानात उतरवलं होतं. त्याने स्वतःदेखील गोलंदाजी केली नाही आणि वेगवान गोलंदाजांकडून संपूर्ण २० षटकं टाकून घेतली. यामुळे २० षटके निर्धारित वेळेत पूर्ण झाली नाहीत. यामागचं कारण होतं खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांना मिळणारी मदत.
गोलंदाजी न करताही अक्षर पटेलने फलंदाजीने महत्त्वपूर्ण योगदान दिलं. २११ धावांचे लक्ष्य गाठताना दिल्लीची सुरूवात खूपच खराब झाली आणि संघाने झटपट सुरुवातीच्या विकेट्स गमावल्या. कर्णधार अक्षर पटेलने डेव्हिड मिलरसोबत एक भक्कम भागीदारी रचली. अक्षरने ३० चेंडूंमध्ये ५६ धावा केल्या. अक्षर पटेल बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलर, आशुतोष शर्मा आणि माधव तिवारी यांनी आक्रमक फलंदाजी करत २११ धावांचं लक्ष्य अवघ्या १९ षटकांत यशस्वीपणे पूर्ण केलं, यासह दिल्लीने पंजाब संघावर २ विकेट्सने विजय मिळवला.
पंजाब किंग्स संघावरील विजयामुळे दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. जर त्यांनी त्यांचे पुढील दोन्ही सामने जिंकले, तर ते १४ गुणांसह पात्र ठरू शकतात. पण, त्यांना अशी आशा करावी लागेल की, लीग टप्प्यातील संघांपैकी त्यांच्या जोडीला एका संघाचेहू १४ गुण असावेत. जर दिल्लीचा नेट रन रेट चांगला असेल, तर ते पात्र ठरतील.
Comments are closed.