22 आमदार घेऊन तटकरे आणि पटेल भाजपमधून लढणार; रोहित पवारांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर रोहित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी काल रात्री शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र शरद पवारांसोबतची भेट ही केवळ तब्येतीची विचारपूस करण्यासाठी होती, असं सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं. परंतु आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी खळबळजनक दावा केला आहे.
22 आमदार घेऊन सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे भाजपमधुनच लढणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे देखील काही आमदार भाजपच्या गळाला लागले आहे, असा दावा रोहित पवारांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला. मावळचा आमदार (सुनिल शेळके ) भाजपमधूनच लढणार आहेत, असा मोठा दावा रोहित पवारांनी केला आहे. तसेच शरद पवारांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरेंना कदाचित सिल्व्हर ओकचा चहा आवडत असेल, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला. (Rohit Pawar On Sunil Tatkare Meets Sharad Pawar)
शरद पवारांच्या भेटीनंतर सुनील तटकरे आज एक्सवर पोस्ट करत काय म्हणाले? (Sunil Tatkare On Sharad Pawar Meets)
काल आदरणीय शरद पवार साहेबांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, प्रकृतीची विचारपूस केली. गेल्या काही काळात साहेबांची तब्येत ठीक नव्हती, त्याकरता ते ब्रीचकँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. तेव्हापासून त्यांच्या भेटीसाठी जाण्याचे प्रयोजन होते, परंतु मधल्या काळात वेळ जुळून येत नसल्याने ही भेट अखेरीस काल झाली. या भेटीत कुठल्याही राजकीय विषयांवर चर्चा झाली नाही, तसा कुठला उद्देशही या भेटीचा नव्हता. गेली सहा दशके साहेब देशाच्या राजकारणात महत्वाचे योगदान देत आहेत. मी दीर्घकाळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले, माझ्या राजकीय जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे भेट देणे, तब्येतीची विचारपूस करणे हा महाराष्ट्राच्या राजकारणापलीकडच्या समृद्ध राजकीय परंपरेचा भाग आहे. या परंपरेला अनुसरूनच ही भेट झाली. साहेबांची प्रकृती आता उत्तम असून त्यांची काम करण्याची ऊर्जा पूर्वीसारखीच आजही कायम आहे, असं सुनील तटकरे एक्सवर आज पोस्ट करत म्हणाले.
काल आदरणीय शरद पवार साहेबांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, प्रकृतीची विचारपूस केली. गेल्या काही काळात साहेबांची तब्येत ठीक नव्हती, त्याकरता ते ब्रीचकँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. तेव्हापासून त्यांच्या भेटीसाठी जाण्याचे प्रयोजन होते, परंतु…
— सुनील तटकरे (@SunilTatkare) 13 मे 2026
राष्ट्रवादीचे आमदार आम्ही फोडणार नाही- देवेंद्र फडणवीसांनी माझा व्हिजनमध्ये स्पष्ट सांगितलेलं-
एबीपी माझाच्या माझा व्हिजन या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार आम्ही फोडणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये सुरुवातीला असुरक्षितता होती. पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) काम करत आहेत, दृढता दिसते. महिना दोन महिन्यात पक्ष स्थिरस्थावर होईल. त्यांच्या पक्षातील कोणालाही आम्ही आमच्या पक्षात घेणार नाही. राष्ट्रवादीचे आमदार फोडणार नाही. पण त्यांच्या पक्षाला जी मदत लागेल ती करू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Majha Vision) म्हणाले होते.
सुनील तटकरे, प्रफुल पटेल काय निर्णय घेणार? (Sunil Tatkare Meets Sharad Pawar)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली आणि त्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. मंगळवारी दिवसभर सुनील तटकरे यांना महासचिव आणि प्रफुल पटेल यांना राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदावरून काढले आहे, अशी चर्चा सुरू असताना त्याचवेळी सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे आता काही वेगळा निर्णय तर हे दोन्ही नेते घेत नाहीत ना अशा चर्चेला सुरुवात झाली आहे. कारण सुनील तटकरे यांना आपण महासचिव पदावर आता असणार की नसणार असा प्रश्न विचारताच त्यांनी या प्रश्नावर मौन बाळगल्याची पाहिला मिळाल. शरद पवारांची तब्येत पाहण्यासाठी आपण आलो होतो अशी प्रतिक्रिया दिली आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर तब्बल 3 वर्षानंतर सुनील तटकरे हे सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवारांना भेटायला आल्याचं पाहायला मिळालं. सुनेत्रा पवार यांच्या एक्स अकाउंटवरून सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या पदावरून सुरू असलेल्या गोंधळावर पोस्ट करत टायपो मिस्टेक असल्याचं सांगण्यात आलं आहे. परंतु मार्च महिन्यात देखील निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या मिनिट्समध्ये देखील सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदांपुढे काहीच न लिहिल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे आता पुन्हा हाच प्रकार घडल्यामुळे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.