तटकरे-पटेल 22 आमदारांसह भाजपमधून लढणार, रोहित पवारांचा दावा; सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया,

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी काल (मंगळवारी, ता 12) रात्री शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा होत असतानाच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी खळबळजनक दावा केला.  22 आमदार घेऊन सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे भाजपमधुनच लढणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे देखील काही आमदार भाजपच्या गळाला लागले आहे, असा दावा रोहित पवारांनी आज माध्यमांशी बोलताना केला. मावळचा आमदार (सुनिल शेळके ) भाजपमधूनच लढणार आहेत, असा मोठा दावा रोहित पवारांनी केला आहे. रोहित पवारांच्या या मोठ्या दाव्यावरती सुनील तटकरेंनी एका वाक्यात प्रतिक्रिया देत विषय संपवला आहे.

Sunil Tatkare:  रोहित पवारांच्या दाव्यावर सुनील तटकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया

एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना सुनील तटकरेंनी रोहित पवारांच्या मताला मी किंमत देत नाही, असं म्हटलं आहे, एका वाक्यात उत्तर देत त्यांनी या विषय संपवला आहे. रोहित पवारांच्या वक्तव्यावरती मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी देखील एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे, शेळके म्हणाले की,काही महिन्यांपासून पाहत असाल, रोहित पवार खोटं बोलत आहेत, ते खोटं बोलून जनतेला फसवतं आहे, आपल्याला प्रसिध्दी मिळावी यासाठी रोहित पवार वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. बारामतीत जी पोट निवडणूक झाली त्यात काँग्रेसचा उमेदवार असावा असा हट्ट धरला होता, ते आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगावं का? 2029 ला रोहित पवार काँग्रेस पक्षाकडून बारामतीत उभा राहण्याचा प्लॅन करत आहेत ते आम्हाला माहिती आहे पण हे आम्ही बोलून दाखवत नाही, पण रोहित पवार वक्तव्ये करून पक्षामध्ये चलबिचल करण्याचा प्रयत्न रोहित पवार करत आहेत, पण त्याचा काहीही फरक पडणार नाही असंही शेळकेंनी म्हटलं आहे.

Rohit Pawar: रोहित पवार नेमकं काय म्हणालेत?

22 आमदार घेऊन सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे भाजपमधुनच लढणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे देखील काही आमदार भाजपच्या गळाला लागले आहे, असा दावा रोहित पवारांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला. मावळचा आमदार (सुनिल शेळके ) भाजपमधूनच लढणार आहेत, असा मोठा दावा रोहित पवारांनी केला आहे. तसेच शरद पवारांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरेंना कदाचित सिल्व्हर ओकचा चहा आवडत असेल, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला. (Rohit Pawar On Sunil Tatkare Meets Sharad Pawar)

Sunil Tatkare Post:  शरद पवारांच्या भेटीनंतर सुनील तटकरे आज एक्सवर पोस्ट करत काय म्हणाले?

काल आदरणीय शरद पवार साहेबांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, प्रकृतीची विचारपूस केली. गेल्या काही काळात साहेबांची तब्येत ठीक नव्हती, त्याकरता ते ब्रीचकँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. तेव्हापासून त्यांच्या भेटीसाठी जाण्याचे प्रयोजन होते, परंतु मधल्या काळात वेळ जुळून येत नसल्याने ही भेट अखेरीस काल झाली. या भेटीत कुठल्याही राजकीय विषयांवर चर्चा झाली नाही, तसा कुठला उद्देशही या भेटीचा नव्हता. गेली सहा दशके साहेब देशाच्या राजकारणात महत्वाचे योगदान देत आहेत. मी दीर्घकाळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले, माझ्या राजकीय जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे भेट देणे, तब्येतीची विचारपूस करणे हा महाराष्ट्राच्या राजकारणापलीकडच्या समृद्ध राजकीय परंपरेचा भाग आहे. या परंपरेला अनुसरूनच ही भेट झाली. साहेबांची प्रकृती आता उत्तम असून त्यांची काम करण्याची ऊर्जा पूर्वीसारखीच आजही कायम आहे, असं सुनील तटकरे एक्सवर आज पोस्ट करत म्हणाले.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.