Jalna news – लग्नात अवकाळीचे विघ्न; घनसावंगीत मंडप, घरावरील पत्र उडाले, अन्नधान्य भिजले
जालन्यातील घनसावंगी तालुक्यात 13 मे रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास वादळी वार्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. जोरदार वारे आणि अवकाळी पावसामुळे बोडखा येथील लावलेला लग्नाचा मंडप तसेच घरावरील पत्रे उडून गेले. यामुळे योगेश उद्धव ढेरे या शेतकर्याने घरात साचवून ठेवलेले अन्नधान्यही भिजले आहे.
जालन्यातील घनसावंगी तालुक्यात घनसावंगी, बोडखा, म. चिचोली, शिंदखेड, खडकावाडी, खडका, मांदळा, मंगूजळगावसह आदी गावात वादळी वार्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे ज्वारी, बाजरी, गहू तसेच आंबा, फळपिकांसह भाजीपाला आणि ऊसाच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने लग्न सोहळ्यात अवकाळीने विघ्न घातल्याने वधू वर पित्यांचे चांगलेच टेन्शन वाढले आहे. वादळी वार्याने मंडप उडाल्याने मंडप वाल्याचे देखील नुकसान झाले आहे.
घनसावंगी तालुक्यात काल पासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक आणि बागायतदारांना मोठा फटका बसण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे मात्र उन्हाळी मशागतीच्या कामांना ब्रेक लागला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले पाहायला मिळाले. वादळी वार्याने झाडाखाली आंब्याचा सडा पडलेला दिसून येत असून नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकर्याकडून करण्यात येत आहे.
लग्नात अवकाळी विघ्न
आपल्या लाडक्या लेकीचे लग्न धूमधडाक्यात व्हावे. यासाठी वधूकडील मंडळी लग्न मंडप, डीजे,कॅमेरावाला यासाठी खर्च करतात. तसेच चांगला आचारी लावून स्वयंपाक बनवून घेतात. परंतु अवकाळी पावसाने लग्नात विघ्न आणल्याने आमचा मंडप, स्टेज आणि सर्व रोषनाईच्या साहित्याचे नुकसान होत आहे. अवकाळी पावसामुळे डिजिटल साहित्याचे नुकसान होत आहे, असे तीर्थपुरी येथील मंडप व्यवसायिक अशोक जगताप यांनी सांगितले.
Comments are closed.