तुम्ही मुख्यमंत्री असता तर महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंचं वक्तव्य
सोलापूर : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आज पालखी मार्गाची पाहणी केली, त्यानंतर सोलापूर दौऱ्यात 2,784 कोटींच्या 5 राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन केले. या कार्यक्रमात सोलापुरातील आमदार, खासदारांची उपस्थिती होती. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे (Praniti shinde) यांची देखील सोहळ्याला आवर्जुन उपस्थिती होती. या सोहळ्याता बोलताना प्रणिती शिंदेंनी नितीन गडकरींच्या (Nitin gadkari) कामावर स्तुतीसुमने उधळली. तसेच, तुम्ही माझ्या वडिलांचे जवळचे मित्र. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात तर महाराष्ट्राची परंपरा आणखी बळकट झाली असती, असे प्रणिती शिंदेंनी म्हटलं. तसेच, तुम्ही तेही दिवस पाहिले आहेत, जे दिवस तुम्ही पाहिले ते वेगळे होते. मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते की ते दिवस पुन्हा येऊ देत, असेही त्यांनी म्हटलं.
प्रणिती शिंदेंनी केलेल्या राजकीय वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. आपण हा कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमासाठी मला निमंत्रण पाठवलं. सर्व खासदारांसाठी कायम ज्यांचा दरवाजा उघडा असतो असे नेते म्हणजे गडकरी साहेब, असे म्हणत नितीन गडकरी यांच्याकडे पक्षीय भेद नसतो, हेच त्यांनी सूचवलं. विरोधक जिथे राजकीय शत्रू म्हणलं जातं, त्यावेळी तुम्ही आम्हाला विरोधी पक्ष असून ही राजकीय भूमिका बाजूला ठेवून आमची कामा करता. तुम्ही जर मुख्यमंत्री असता तर महाराष्ट्राच्या विकासाला आणखी बळ मिळाला असतं, पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र पुढे गेला असता, अशा शब्दात प्रणिती शिंदेंनी नितीन गडकरींच्या कामाबद्दल गौरवोद्गार काढले. प्रणिती शिंदेंच्या यावक्तव्याची जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता
ज्यावेळेस तुम्ही मी दिलेल्या पत्रावरती रिमार्क करून कामाला मंजूर दिली, त्यावेळेस मला असं वाटलं की तुमच्यासारख्या नेत्याची महाराष्ट्राला उणीव आहे. जर कदाचित तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात तर महाराष्ट्राची परंपरा आणखी बळकट झाली असती. आम्हाला आणखी बळ मिळाले असते. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र राहिला असता, हे आणखी हिमतीने मी सांगू शकते, असे म्हणत प्रणिती शिंदेंनी नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक केलय. तुम्ही माझ्या वडिलांचे जवळचे मित्र. तुम्ही तेही दिवस पाहिले आहेत, जे दिवस तुम्ही पाहिले ते वेगळे होते. मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते की ते दिवस पुन्हा येऊ देत, असेही प्रणिती शिंदेंनी म्हटलं.
सोलापूरच्या सर्व मागण्या पूर्ण करतो – नितीन गडकरी
स्मार्ट व्हिलेजसाठी मी प्रयत्न करतोय, विकासाचा असमतोल निर्माण झालाय तो होऊ नये. ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी रस्ता झाला याचा आनंद आहे. मात्र, हे श्रेय माझं एकट्याच नाही, असंख्य इंजिनियर आणि कंत्राटदार माझ्यासोबत काम करत आहेत. आमदार, खासदार यांचं श्रेय यामध्ये आहे, त्यामुळे मी केवळ निमित्त मात्र आहे, असे गडकरी यांनी म्हटले. सोलापूर जिल्हा हा लॉजिस्टिक हब बनणार आहे, काश्मीर से कन्याकुमारी तक असं आम्ही म्हणायचो. आता होणारे रस्ते हे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आहेत. प्रणिती शिंदे आणि सचिन कल्याणशेट्टी यांनी ज्या मागण्या केल्या त्या सर्व मी पूर्ण करतो. सोलापूरचा रिंगरोड 1455 कोटी रुपयांच्या 33 किलोमीटर रोडला मान्यता देतो, सोलापुरातला दुसरा रिंगरोड 1300 कोटी रुपयांचा आहे, त्यालाही मंजूर करतोय. आज पालखी महामार्ग बघण्यासाठी मी आलो होतो, मला प्रचंड आनंद आहे. 22 हजार कोटी खर्च करून मी बौद्ध सर्किट पूर्ण केलं. मी बोधीवृक्षाखाली थांबलो होतो, त्यावेळी बोधी वृक्षाचे पान आधी माझ्या, नंतर बायकोच्या खांद्यावर पडले. त्यावेळी भिक्षु म्हणाले की गौतम बुद्धचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला, असा सुखद अनुभवही गडकरींनी सांगितला.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.