6 वर्षे बाहेर ठेवलं, IPL नेही नाकारलं… टीम इंडियाच्या खेळाडूची अचानक निवृत्तीची घोषणा

Vijay Shankar Retirement Marathi News : भारतीय संघाचा ‘3D प्लेयर’ म्हणून ओळखला जाणारा विजय शंकर (Vijay Shankar) याने अखेर घरगुती क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आयपीएल 2026 च्या लिलावात कोणत्याही फ्रँचायझीने त्याच्यावर बोली लावली नव्हती. त्यानंतर विजय शंकरने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या निर्णयाची माहिती चाहत्यांना दिली. अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख असलेल्या विजय शंकरने भारतासाठी अनेक महत्त्वाचे सामने खेळले. विजय शंकरने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत हा मोठा निर्णय जाहीर केला. मात्र, त्याने क्रिकेटला पूर्णविराम दिलेला नाही. नव्या संधींच्या शोधात तो पुढेही क्रिकेट खेळत राहणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.

35 वर्षीय विजय शंकरने भारतासाठी 12 वनडे आणि 9 टी-20 सामने खेळले. 2019 नंतर मात्र त्याला टीम इंडियात पुन्हा संधी मिळाली नाही. तरीही त्याने क्रिकेटवरील प्रेम कायम ठेवत आपल्या प्रवासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये काय लिहिले? (Vijay Shankar Retirement News)

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये विजय शंकर म्हणाला, “क्रिकेट हीच माझी जिंदगी आहे. वयाच्या दहाव्या वर्षी मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि तब्बल 25 वर्षांच्या प्रवासात मला देशासाठी खेळण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. भारताचं प्रतिनिधित्व करणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानाचा क्षण राहील. आता नव्या संधींच्या शोधासाठी मी घरगुती क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेत आहे.”

त्याने पुढे बीसीसीआय आणि भारतीय संघाचे आभार मानताना सांगितले की, “देशासाठी खेळताना मला खूप काही शिकायला मिळालं. नागपूरमध्ये भारताच्या 500व्या वनडे सामन्यात शेवटचं षटक टाकणं आणि 2019 वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट घेणं हे क्षण मी आयुष्यभर जपून ठेवेन.”

आयपीएलमध्ये कोण-कोणत्या संघांत खेळला?

आयपीएलमध्ये विजय शंकरने गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांचे प्रतिनिधित्व केले. त्याने आयपीएलमधील 78 सामन्यांत 1233 धावा आणि 9 विकेट्स घेतल्या. मात्र आयपीएल 2026 च्या लिलावात 30 लाखांच्या बेस प्राईसवर नोंदणी करूनही त्याला कोणत्याही संघाने संधी दिली नाही. तमिळनाडू क्रिकेटमधील आपल्या प्रवासाबद्दल बोलताना त्याने राज्य संघ, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांचे विशेष आभार मानले. तसेच कुटुंबीय आणि मित्रांनी प्रत्येक कठीण प्रसंगी दिलेल्या पाठिंब्याबद्दलही तो भावूक झाला.

शेवटी एक भावनिक संदेश

पोस्टच्या शेवटी विजय शंकरने एक भावनिक संदेश दिला. “माझ्यावर खूप टीका आणि नकारात्मकता आली. पण मी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मी करू शकतो, तर कुणीही करू शकतो. सकारात्मक राहा आणि मेहनत करत राहा. क्रिकेटनेच मला जगायला शिकवलं आहे,” असं त्याने म्हटलं.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये विक्रम असा होता?

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये विजय शंकरने 77 सामन्यांत 4253 धावा केल्या असून त्यात 13 शतकं आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या नावावर 43 विकेट्सही आहेत. तसेच लिस्ट-A क्रिकेटमध्ये 2790 धावा आणि टी-20 क्रिकेटमध्ये 2583 धावा त्याने केल्या आहेत.

हे ही वाचा –

CSK IPL 2026 : MS धोनी खेळणार खेळणार म्हणत सगळ्यांना गंडवलं; चेन्नईचा स्कॅम अन् लोकांच्या शिव्या, आता दिग्गज क्रिकेटपटूही नको नको ते बोलले

आणखी वाचा

Comments are closed.