अर्शदीप सिंगने 200 हून अधिक पोस्ट केल्या डिलीट! विराट कोहलीच्या व्हायरल व्हिडिओचाही समावेश, नेमके प्रकरण काय?
आयपीएल २०२६ मधून आपला संघ बाहेर पडल्यानंतर एका खेळाडूने त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरील अनेक पोस्ट हटवल्या आहेत. पंजाब किंग्ज स्पर्धेबाहेर झाल्यानंतर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील अनेक फोटो-व्हिडिओ डिलीट केले आहेत. पाहिले तर त्याच्यासाठी हा हंगाम अतिशय कठीण गेला आहे. त्याने १४ सामन्यांत केवळ १४ विकेट्स घेतल्या आणि प्रति षटक १० पेक्षा अधिक धावाही खर्च केल्या.
अर्शदीपने सोशल मीडियावर अनेक पोस्ट डिलीट केल्याने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे त्याने स्टार फलंदाज विराट कोहलीसोबतची त्याची व्हायरल रील देखील डिलीट केली आहे, ज्याला १५ दशलक्षापेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले होते. गेल्या वर्षी पोस्ट केलेल्या या रीलमध्ये अर्शदीपने विराटला गंमतीने म्हटले होते की, जर लक्ष्य मोठे असते, तर माजी कर्णधाराने सलग तिसरे शतक झळकावले असते.
“पाजी, रन कम रहेगाये, शतक आज पक्की थी वैसे”, असे अर्शदीप विराटला म्हणाला होता. त्यावर विराट त्याला म्हणाला, “टॉस जिंकला नाही तर तुझे शतक झाले असते.”
अर्शदीपच्या या पोस्ट डिलीट करण्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही, तरी त्याच्या अकाऊंटवर सध्या केवळ ४५ च्या आसपास पोस्ट बाकी आहेत. यामागील एक माहिती समोर आली आहे. पंजाब किंग्ज खेळाडूंशी संबंधित व्हिडिओ आता केवळ फ्रॅंचायजीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅंडलवरून तयार करून पोस्ट करणे बंधनकारक असल्याच्या अलीकडच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड समोर आली आहे.
आयपीएल २०२६ दरम्यान अनेक वादग्रस्त घटनांना सामोरे गेल्यानंतर अर्शदीप सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. या हंगामाच्या सुरूवातीला पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्याआधी त्याने तिलक वर्मावर केलेल्या कथित वर्णद्वेषी टिप्पणीवरून त्याच्यावर टीका झाली होती.
Comments are closed.