अर्थखात्यावरून सुनेत्रा पवारांची नाराजी, राष्ट्रवादीला खातं मिळत नसल्याची खंत, सूत्रांची माहिती
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर सात दिवसांत अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीला देण्याबाबत भाजपकडून आश्वासन देण्यात आलं होतं, परंतु सतत विषय काढूनही ते खातं अद्याप देण्यात आलं नसल्याची खंत राष्ट्रावादीच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यावेळी माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमधील कुंभमेळ्याच्या कामावरून नाराजी व्यक्त केल्याची देखील माहिती आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीची बैठक पार पडली. आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवारांनी अर्थखात्यावरून खंत व्यक्त केली अशी माहिती सूत्रांनी दिली. या आधी अर्थखातं हे अजित पवारांकडे होतं. परंतु त्यांच्या अपघाती निधनानंतर हे खातं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आलं. अजित पवारांकडे असलेलं एक्साईज खातं मात्र सुनेत्रा पवारांना देण्यात आलं.
अर्थखात्यावरून महायुतीत नाराजी
राज्याचा अर्थसंकल्प तोंडावर असताना अर्थखातं हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतलं होतं. अधिवेशन झाल्यानंतर हे खातं पुन्हा एकदा राष्ट्रवादीला देण्यात येईल असं आश्वासनही देण्यात आलं होतं. मात्र अर्थखात्याबाबत सातत्याने विचारणा करूनदेखील त्यावर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला नाही अशी खंत सुनेत्रा पवारांनी आमदारांच्या बैठकीत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कुंभमेळ्याच्या कामावरून राष्ट्रवादीत नाराजी
त्याचवेळी नाशिकमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या कामावरुन माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. नाशिकमध्ये कुंभमेळ्याची 25 हजार कोटींची कामं सुरू आहेत. मात्र त्यापैकी एकही काम राष्ट्रवादीला देण्यात आलं नसल्याचं सांगत माणिकराव कोकाटे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवारांनी अर्थखात्यासंबंधी केलेल्या दाव्यामुळे आगामी काळात महायुतीतला वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजी
गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत वादाच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकी काही नेत्यांनी वादांच्या विषयावर भाष्य केल्यानं ही बैठक चांगलीच वादळी ठरली. सुरुवातीला सुनील तटकरे यांनी त्यांच्यावर सातत्याने होणाऱ्या टीकांवरून उपस्थित असलेल्या सर्वांनाच सुनावलं. माझ्यावर आणि प्रफुल पटेलांवर सातत्याने टीका होत असताना कुणीही आमच्या बाजूने उभं राहत नाही, असं खंत त्यांनी बोलून दाखवली.
तसंच प्रफुल पटेल आणि तटकरे यांनीच टीकेचे धनी का व्हायचे? वरिष्ठ नेतृत्व याबाबत काही भूमिका घेणार आहे की नाही? असा सवालही यावेळी सुनील तटकरेंनी विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे मुंबईत उपस्थित असूनही पटेलांनी या बैठकीला दांडी मारल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या आहेत.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.