फक्त मार्च-मे नाही! आता 2 फेजमध्ये रंगणार IPL थरार, BCCIच्या नव्या मास्टरप्लॅनने सगळेच हैराण

आयपीएल बातम्या अपडेट: जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय क्रिकेट लीग मानली जाणारी आयपीएल आता मोठ्या बदलांच्या उंबरठ्यावर उभी आहे. आतापर्यंत मार्चच्या शेवटी सुरू होणारी आणि मे महिन्यापर्यंत चालणारी ही स्पर्धा भविष्यात दोन टप्प्यांत खेळवली जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या नव्या योजनेमुळे चाहत्यांना सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येही आयपीएलचा थरार अनुभवायला मिळू शकतो.

आयपीएलमधील सामन्यांची संख्या 74 वरून 94 पर्यंत वाढणार?

सध्या आयपीएलमध्ये एकूण 74 सामने खेळवले जातात. मात्र येत्या काही वर्षांत ही संख्या तब्बल 94 पर्यंत वाढवण्याचा विचार सुरू आहे. जगभरातील क्रिकेट बोर्ड, प्रायोजक आणि ब्रॉडकास्टर्ससाठी आयपीएलचे वाढते महत्त्व पाहता अधिक सामने खेळवण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर सामने सलग आयोजित करणे सोपे नाही. विशेषतः एप्रिल आणि मे महिन्यात भारतातील उष्णता आणि प्रचंड दमट हवामान खेळाडूंसाठी मोठे आव्हान ठरते.

उन्हाळ्यात अनेक खेळाडूंना दुखापतींचा सामना करावा लागतो. थकवा, डिहायड्रेशन आणि सततचा प्रवास यामुळे स्पर्धेची गुणवत्ता देखील प्रभावित होण्याची शक्यता असते. याच पार्श्वभूमीवर आयपीएलचे चेअरमन Arun Kumar Dhumal यांनी मोठा संकेत दिला आहे. त्यांनी सांगितले की, जर International Cricket Council च्या फ्युचर टूर प्रोग्राम (FTP) आणि ब्रॉडकास्टर्ससोबत योग्य समन्वय झाला, तर आयपीएलचे दोन फेज करण्याचा पर्याय गांभीर्याने विचाराधीन आहे.

आयपीएलचा दुसरा टप्पा सप्टेंबर ते ऑक्टोबर?

या प्रस्तावानुसार आयपीएलचा पहिला टप्पा फेब्रुवारीच्या अखेरीपासून एप्रिलपर्यंत खेळवला जाऊ शकतो. त्यानंतर काही महिन्यांचा ब्रेक देऊन दुसरा टप्पा सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्याची योजना आहे. यामुळे खेळाडूंना विश्रांती मिळेल, हवामानाचा त्रास कमी होईल आणि स्पर्धेतील दर्जाही उंचावण्यास मदत होईल.

सप्टेंबर-ऑक्टोबर हा काळ निवडण्यामागे आणखी एक मोठं कारण म्हणजे भारतातील वातावरण. त्या काळात पावसाळा संपलेला असतो आणि थंड हवामानाची सुरुवात होत असते. त्यामुळे सामने खेळण्यासाठी परिस्थिती अधिक अनुकूल राहते. शिवाय ऑक्टोबर महिन्यात भारतात गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळीसारखे मोठे सण येतात. या काळात जाहिरातींचा बाजार प्रचंड वाढतो. मोठ्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर जाहिरातींवर खर्च करतात. त्यामुळे ब्रॉडकास्टर्स, स्पॉन्सर्स आणि बीसीसीआयला आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होऊ शकतो.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सध्या या संपूर्ण योजनेवर गंभीरपणे विचार करत असल्याचे समजते. जर 2027 नंतरच्या नव्या मीडिया आणि FTP सायकलमध्ये आयपीएलला अधिकृत विंडो मिळाली, तर 2028 किंवा 2029 पासून आयपीएल दोन टप्प्यांत खेळवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे ही वाचा –

RCB vs GT : धर्मशाळेत मॅच सुरू होती, पण पडद्यावर जे दिसलं, त्यामुळे सगळेच चक्रावले; भारताच्या नकाशाशी छेडछाड, BCCI अजून गप्प, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.