“हा मुर्खासारखा प्रश्न…”, ग्लेन फिलिप्स संतापला; गुजरातच्या पराभवानंतर पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?
आयपीएल २०२६ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सवर दणदणीत विजय मिळवला. आरसीबीने सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवत गुजरातचा तब्बल ९२ धावांनी पराभव केला. आरसीबीने प्लेऑफच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारत गुजरातला विजयासाठी २५५ धावांचं लक्ष्य दिलं होतं, परंतु गुजरात टायटन्स केवळ १६२ धावाच करू शकली. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत गुजरातचा खेळाडू ग्लेन फिलिप्सला असा प्रश्न विचारण्यात आला की ज्यामुळे तो संतापला.
आरसीबीने दिलेल्या २५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातने सुरूवात चांगली केली, पण पॉवरप्लेमध्येच संघाने अखेरीस ५ विकेट्स गमावले. साई सुदर्शन हिट विकेटवर बाद झाला. तर शुबमन गिल व बटलरला भुवनेश्वर-हेझलवूडने बोल्ड केलं. यानंतर रसिख सलाम दारने सहाव षटक डबल विकेट्स मेडन टाकत गुजरातच्या फलंदाजीला सुरूंग लावला आणि परिणामी संघ १६२ धावांवर सर्वबाद झाला.
आरसीबीच्या फलंदाजांनी २० षटकांत २५४ धावा करून गुजरात टायटन्सचा धुव्वा उडवला होता. एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणं सोपं नसतं आणि गुजरातचा संघही त्यात अपयशी ठरला. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत ग्लेन फिलिप्स गुजरातचे प्रतिनिधित्व करत होता. २५० हून अधिक धावांचे लक्ष्य पाहून जीटीने हार मानली का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकून ग्लेन संतापला आणि म्हणाला, “हा काय मूर्खसारखा प्रश्न आहे. असा कोणी विचार करत नाही की आता आपण हार मानूया. व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून आम्ही तसा विचार का करावा? हा पूर्णपणे चुकीचा प्रश्न आहे.”
ग्लेन फिलिप्स म्हणाला की, सर्वोत्तम प्रयत्न केला पण संघ अयशस्वी ठरला. फिलिप्स म्हणाला, आम्ही मैदानात उतरून सर्वस्व पणाला लावलं. पण २५० धावांचा पाठलाग करताना प्रत्येक गोष्ट तुमच्या बाजूने जाणं गरजेचं असतं. आम्ही तेच करण्याचा प्रयत्न केला, मात्र दुर्दैवाने तसं घडलं नाही.”
गुजरात टायटन्सने गुणतालिकेत दुसरं स्थान मिळवल्याने त्यांना पहिल्या क्वालिफायकरमध्ये खेळण्याची संधी मिळाली. हा सामना हरूनही, त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्याची आणखी एक संधी आहे. एलिमिनेटर सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवला जाईल. विजेता संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश करेल, जिथे त्यांचा सामना गुजरात टायटन्सशी होईल. जर गुजरातने हा सामना जिंकला, तर अंतिम फेरीत त्यांचा सामना पुन्हा आरसीबीशी होऊ शकतो.
Comments are closed.