इंधन टंचाई आणि महागाई हे मोदी सरकारचे पाप, आत्मनिर्भरतेचे गाजर दाखवून अर्थव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष! – हर्षवर्धन सपकाळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरतेचे गाजर दाखवून अर्थव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यानेच इंधन संकट ओढवले आहे. कोणतेही ठोस धोरण नसल्याने पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी गॅसची मोठ्या प्रमाणात भाववाढ करावी लागत आहे. इंधन कमतरता होणार हे दिसत असतानाही नरेंद्र मोदी पाच राज्याच्या निवडणूक प्रचारात व्यस्त होते, त्याची मोठी किंमत देशातील जनतेला मोजावी लागत आहे. इंधन दरवाढ व टंचाई हे नरेंद्र मोदी यांचेच पाप आहे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

२०१४ साली सत्तेत आल्यापासूनच मोदी सरकारने इंधनाचे भाव सातत्याने वाढवले आहेत. यातून तेल कंपन्यांनी भरमसाठ नफा कमावला आहे. मोदी सरकारने तेलासाठी रिझर्व्ह फंड तयार केला असता तर ही वेळ आली नसती पण कंपन्यांचे हित लक्षात घेतले, हा मोठा भ्रष्टाचारच आहे. इंधन व गॅस चंटाईचा मोठा फटका हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, छोटे उद्योगधंदे व घरातील स्वयंपाकालाही बसला आहे. नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणामुळेच अर्थव्यवस्था कोलमडली आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला.

कांद्याप्रश्नी दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना महाराष्ट्राचे अर्धे मंत्रिमंडळ भेटले पण महाराष्ट्राला त्यांनी वाटाण्याच्या अक्षताच दिल्या. सरकार १५०० रुपयाने कांदा खरेदी करण्याचे सांगत आहे पण ३००० रुपये प्रति क्विंटल भाव व नाफेडमार्फत कांदा खरेदी केली पाहिजे आणि शेतकऱ्यांचा सर्व कांदा खरेदी केला पाहिजे, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. नरेंद्र मोदी २०१४ साली नाशिकला आले होते, मी कांदा खाल्ला आहे, तुमच्याशी बेईमानी करणार नाही, सत्तेत आलो की २४०० रुपये भाव देणार असे आश्वासन दिले होते, तीच री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओढली होती पण आता मात्र ते फक्त १५०० रुपये भाव देण्याची भाषा करत आहेत, ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर पुन्हा आंदोलन करु, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

दंगली भडकवण्याचा डाव

देशात दंगली घडवून पुन्हा २०२९ साली सत्तेत यायचे हे भाजपचे षडयंत्र असून बकरी ईदच्या निमित्ताने जे वातावरण निर्माण करण्यात आले, ही त्या दंगलीची एक चुणूक होती. प्रत्येक सण उत्सवात हिंदू-मुस्लीम मुद्दा आणायचा आणि धार्मिक वातावरण बिघडवायचे हा भाजपचा अजेंडा आहे. तर दुसरीकडे बकरी ईद प्रश्नी भाजपने घेतलेल्या भूमिकेमुळे पशुपालन करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, असा आरोपही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

Comments are closed.