NEET पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर

नीट री परीक्षेची सुरक्षा: देशभरात सातत्याने गाजत असलेल्या वैद्यकीय प्रवेशासाठीच्या ‘नीट’ परीक्षेतील घोटाळे आणि पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आलं आहे. आगामी 21 जून रोजी होणारी नीटची फेरपरीक्षा अत्यंत पारदर्शक, सुरक्षित आणि योग्य रीतीने पार पाडण्यासाठी सरकारनं थेट भारतीय लष्कराची (Indian Army) मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नव्हे, तर देशातील सर्व परीक्षा केंद्रांवर गोपनीय पेपर्स सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी भारतीय वायूदलाची (Indian Air Force) मदत घेतली जाणार आहे. एबीपी माझाशी बोलताना केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली.

NEET ची उच्चस्तरीय बैठक : दिल्लीत एक अतिशय महत्त्वाची बैठक झाली

नीटच्या फेरपरीक्षेच्या नियोजनासंदर्भात आज देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक अत्यंत उच्चस्तरीय आणि महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अधिकृत निवासस्थानी ही बैठक पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, एनटीएचे (NTA) महासंचालक अभिषेक सिंह, सीबीएसईचे (CBSE) वरिष्ठ अधिकारी आणि पंतप्रधान कार्यालयातील (PMO) काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत 21 जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेच्या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ‘एबीपी नेटवर्क’शी खास संवाद साधताना या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली.

Education Ministry Guidelines : परीक्षा ‘फुलप्रूफ’ करण्यासाठी कठोर उपाययोजना

परीक्षेतील वाढते गैरप्रकार रोखण्यासाठी आणि देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचा तसेच पालकांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. या बैठकीत नीट परीक्षा अधिक पारदर्शक आणि ‘फुलप्रूफ’ करण्याबाबत विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.

परीक्षा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक सुधारणा केल्या जाणार असून, संवेदनशील परीक्षा केंद्रांवर कडक पहारा ठेवण्यात येणार आहे. पेपर लीकचा कोणताही मार्ग उरणार नाही, अशा प्रकारे तांत्रिक आणि मानवी सुरक्षा यंत्रणा तैनात केली जाईल. पेपर वाहतुकी दरम्यान होणारे गैरप्रकार टाळण्यासाठीच वायूदलाच्या विशेष विमानांची मदत घेतली जाणार आहे.

NTA Exam Transparency : विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकण्याचं आव्हान

नीट परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर देशभरातून मोदी सरकारवर जोरदार टीका झाली होती. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याच्या तक्रारींनंतर आता खुद्द गृह आणि संरक्षण यंत्रणा या परीक्षेत लक्ष घालत आहेत. लष्कर आणि वायूदलाच्या थेट सहभागामुळे परीक्षा केंद्रांवर पेपर पोहोचण्यापासून ते परीक्षा संपेपर्यंत कडेकोट बंदोबस्त असणार आहे. आता 21 जूनच्या फेरपरीक्षेत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी यंत्रणा दिवसरात्र काम करत आहे.

CBI Investigation Shivraj Motegaonkar : आरोपी मोटेगांवकरच्या बँक लॉकर्सची तपासणी

दुसरीकडे, देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता मोठ्या आर्थिक व्यवहारांची (Money Laundering) जोड मिळताना दिसत आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित अटक आरोपी शिवराज मोटेगांवकर आणि त्याच्या कुटुंबीयांशी संबंधित बँक खाती आणि लॉकर्सची पडताळणी आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) सुरू करण्यात आली आहे.

सीबीआयचे पथक या लॉकर्समध्ये मोठी रोख रक्कम, बेकायदेशीर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि बँक व्यवहारांची माहिती शोधत आहे. या आंतरराज्यीय पेपर लीक रॅकेटच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज सीबीआयच्या हाती लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

https://www.youtube.com/watch?v=V4Pj4sjDqNE

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.