‘आग रामेश्वरी अन् बंब सोमेश्वरी’!; NEET पेपरफुटीवरून रोहित पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा
नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात संतापाचे वातावरण असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. “देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या हवाई दलाला आता एका परीक्षेचे पेपर वाटण्याचे काम देण्याइतकी तकलादू धोरणे आखताना केंद्र सरकारला काहीच वाटत नाही का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच “दुखणे पोटाचे अन् उपचार डोक्याला असा उपचार करणारा डॉक्टर असेल तर रुग्ण मरणारच हे सरकारने ध्यानात घ्यावे,” अशी टीकाही त्यांनी केली
रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करत सरकारला धारेवर धरले आहे. नीट परीक्षेतील पेपरफुटी रोखण्यासाठी हवाई दलाची मदत घेऊन प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवण्याबाबत एका बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. यावरून रोहित पवार यांनी सरकारला समस्येचे मूळच समजले नसल्याचे म्हटले आहे. पेपरफुटीचे मुख्य कारण हे पेपर सेट करणारे लोक आहेत. त्यामुळे ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’चा (NTA) कारभार इतका गलथान असतानाही सरकार त्याकडे कानाडोळा का करत आहे आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान व NTA ला वाचवण्याचा प्रयत्न का केला जात आहे, याचे उत्तर देशाला हवे आहे, अशी मागणी त्यांनी केली.
NEET परीक्षेतील पेपरफूटी रोखण्यासाठी वायुदलाची मदत घेऊन प्रश्नपत्रिका पोहचवण्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचं समोर येत आहे. याचा अर्थ केंद्र सरकारला समस्येचं मूळच कळल्याचं दिसत नाही. पेपरफुटीचे मुळ कारण पेपर सेट करणारी लोक आहेत त्यामुळे NTA संस्थेचा गलथान कारभार असताना त्याकडे… https://t.co/HRtTc1sfDt
– रोहित पवार (@RRPSpeaks) 28 मे 2026
सरकारच्या या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेताना रोहित पवार पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने आता ‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी’ सारखे धंदे तातडीने बंद करावेत. 24 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या NTA या संस्थेवर सरकारने नेमकी काय कारवाई केली, हे स्पष्टपणे जाहीर करावे, अशी मागणी करत त्यांनी सरकारला या गंभीर प्रकरणात ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.
Comments are closed.