कसारा रेल्वे स्थानकात महानगरी एक्सप्रेसच्या जनरेटर बोगीला आग, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
कसारा रेल्वे स्थानकात गोरखपूरहून मुंबईला येणाऱ्या महानगरी एक्सप्रेसच्या जनरेटर बोगी खालील कॉम्प्रेसरला अचानक आग लागली. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आग पाहून गाडीतील प्रवासी भयभीत झाले. प्रवासी तात्काळ प्लॅटफॉर्मवर उतरले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा कुणीही जखमी झाले नाही.
महानगरी एक्सप्रेस कसारा रेल्वे स्थानकावर उभी असतानाच अचानक एक्सप्रेसच्या एका बोगी खालून धूर यायला लागला. त्यानंतर 5 मिनिटांनी कॉम्प्रेसरने पेट घेतला. या दरम्यान हवा सुटल्याने आगीचा भडका उडाला आणि कॉम्प्रेसर, केबल जळाल्या.
आगीची माहिती मिळताच रेल्वे पोलीस, स्टेशन मॅनेजर, कर्मचारी, आपत्कालीन व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. गाडीतील फायर सिलेंडरच्या मदतीने आग आटोक्यात आणली. त्यानंतर 25 मिनिटांनी गाडी मुंबईकडे रवाना झाली. याप्रकरणी शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे, कसारा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुरेश गावित यांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना धीर दिला.
Comments are closed.