कुर्ती, निळ्या रंगाची पँट, उजव्या हातात एक बांगडी…; रायगडमध्ये आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह, प
रायगड क्राईम न्यूज: रायगड (Raigad) जिल्ह्यातील कर्जत-खोपोली राज्यमार्गावरील पळसदरी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुख्य मार्गालगत एका अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हा घातपात आहे की तिची हत्या करण्यात आली आहे? यावरून सध्या स्थानिक पातळीवर विविध चर्चांना उधाण आले आहे.
Raigad Crime News: दुर्गंधी सुटल्याने घटना उघडकीस
पळसदरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून अचानक प्रचंड दुर्गंधी पसरली होती. आजूबाजूला राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना याबाबत संशय आल्याने त्यांनी परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रस्त्यालगत एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडलेला दिसून आला. नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती कर्जत पोलिसांना (Karjat Police) दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला.
Raigad Crime News: मृतदेह आठ दिवस जुना असण्याचा अंदाज
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत महिला साधारण 35 ते 40 वर्ष वयोगटातील असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या महिलेच्या अंगावर कुर्ती आणि निळ्या रंगाची पँट असून, तिच्या उजव्या हातात एक बांगडी आढळून आली आहे. मृतदेहाची अवस्था पाहता हा मृतदेह सुमारे आठ दिवसांपूर्वीचा असावा, असा प्राथमिक अंदाज वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केला आहे.
Raigad Crime News: पोलिसांसमोर ओळख पटवण्याचे आव्हान
या महिलेची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. तिचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, तिच्यासोबत काही गैरप्रकार घडला आहे का, की तिची दुसरीकडे हत्या करून मृतदेह येथे आणून टाकण्यात आला, अशा सर्व बाजूंनी रायगड पोलीस तपास करत आहेत. या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
सध्या रायगड पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मीनल शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद रोकडे, हवालदार लालासाहेब तोरवे यांच्यासह पोलिसांचे विशेष पथक या प्रकरणाचा कसून तपास करत असून महिलेची ओळख पटवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.