IPL 2026 Final – अहमदाबादमध्ये हवामान खात्याचा यलो अलर्ट, ‘रिझर्व्ह डे’वरही पावसाचे सावट! सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार?
IPL 2026 च्या अंतिम सामन्याची करोडो क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यातील या महामुकाबल्यापूर्वी हवामानाने चिंता वाढवली आहे. अहमदाबादमध्ये फायनलच्या दिवशी हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून अहमदाबादमध्ये 43.1 अंश सेल्सिअस तापमानासह भीषण उष्णतेची लाट होती, मात्र आता अचानक बदललेल्या हवामानामुळे अंतिम सामन्यात व्यत्यय येण्याची भीती निर्माण झाली आहे.
हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आयपीएलच्या नियमांनुसार फायनलसाठी ‘रिझर्व्ह डे’ (1 जून) ठेवण्यात आला आहे. मात्र, हवामान खात्याच्या अहवालानुसार, रविवारी 31 मे पेक्षा सोमवार 1 जून रोजी जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आयोजकांचा पहिला प्रयत्न हाच असेल की, षटके कमी करून का होईना सामना रविवारीच पूर्ण केला जावा. जर पावसामुळे दोन्ही दिवशी सामना होऊ शकला नाही, तर लीग स्टेजच्या गुणतालिकेत वरच्या स्थानावर असल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला थेट विजेता घोषित केले जाईल.
वैभव सूर्यवंशीने कसोटी क्रिकेट खेळावे का? सचिन तेंडुलकरने दिले स्पष्ट उत्तर
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाचा हा खेळ नवीन नाही. यापूर्वी 2023 मध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील फायनलचा सामनाही मुसळधार पावसामुळे ‘रिझर्व्ह डे’ला खेळवावा लागला होता. यंदाही हवामानाचा फटका आधीच बसण्यास सुरुवात झाली आहे. क्वालिफायर-2 मध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव केल्यानंतर गुजरात टायटन्सच्या संघाला अहमदाबादला परतताना खराब हवामानाचा सामना करावा लागला. उत्तर-पश्चिम हिंदुस्थानातील वादळामुळे चंदीगड विमानतळावरील विमानांचे उड्डाण प्रभावित झाले, ज्यामुळे गुजरातच्या चार्टर्ड फ्लाईटला उशीर झाला आणि संघ शनिवारी उशिरा रात्री अहमदाबादला पोहोचू शकला.
Comments are closed.