Ratnagiri News – पहिल्याच १० मिनिटांच्या पावसात चिखल आणि वाहतूक कोंडी; नियोजनाचा अभाव उघड
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवी पुल परिसरात पहिल्याच अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. रस्त्यावरील चिखलात अनेक वाहने रुतून बसल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. परिणामी काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली असून पोलिसांनाही वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
महामार्गाच्या कामामुळे रस्त्यालगत मातीचे ढिगारे आणि अपुरी जलनिस्सारण व्यवस्था असल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचले. त्यामुळे संपूर्ण परिसर चिखलमय झाला. वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही या मार्गावरून चालणे कठीण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाळा तोंडावर आला असतानाही महामार्ग प्रशासनाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
पावसाळ्यापूर्वी आवश्यक नियोजन, जलनिस्सारण व्यवस्था आणि रस्त्यावरील सुरक्षेच्या उपायांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.या परिस्थितीमुळे वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून महामार्ग विभागाचे अधिकारी मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका होत आहे. भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे नागरिकांचे हाल होत असल्याने जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
Comments are closed.