Ratnagiri News – तुरळमध्ये फासकीत अडकून बिबट्याचा तडफडून मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

​संगमेश्वर तालुक्यातील तुरळ हरेकरवाडी परिसरातून मूक प्राण्यांच्या जीवावर उठलेल्या क्रूर शिकाऱ्यांनी लावलेल्या फासकीत अडकून एका बिबट्याला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे संपूर्ण संगमेश्वर तालुक्यातील वन्यप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिकारी प्रवृत्तीच्या नराधमांनी लावलेल्या या मृत्यूच्या सापळ्यात अडकून बिबट्याचा तडफडून अंत झाला.

​तुरळवरून माखजनकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच शिकाऱ्यांनी खैराच्या झाडाला जीवघेणी फासकी लावली होती. या रस्त्यावरून जाणाऱ्या बिबट्याचा पाय या फासकीत अडकला आणि स्वतःची सुटका करण्याच्या प्रयत्नात तो झाडालाच लोंबकळत राहिला. अखेर श्वास कोंडून या मुक्या वन्यप्राण्याचा जागीच करुण अंत झाला. शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास स्थानिक पोलीस पाटलांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली.

​माहिती मिळताच वनविभागाचे पथक युद्धपातळीवर आवश्यक साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले. समोरचे दृश्य अत्यंत भयानक होते, बिबट्याचा मृतदेह झाडाला लोंबकळत होता. वन कर्मचाऱ्यांनी तात्काळ ती लोखंडी तार कापून, फासकीसहित झाडाचा खुंट तोडून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. सुदैवाने, शिकाऱ्यांना बिबट्याचे अवयव लंपास करता आले नाहीत, त्याचे सर्व अवयव सुस्थितीत आढळून आले.

यानंतर वनविभागाने तत्परता दाखवत कडवईच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांमार्फत मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून घेतले. शिकार करून तस्करी करण्याचा कट उधळण्यासाठी अखेर बिबट्याच्या मृतदेहावर सर्व अवयवांसह जागेवरच अग्नी डाग देऊन तो नष्ट करण्यात आला. या शिकारीच्या कृत्याला चोख उत्तर देण्यासाठी वनपाल सागर गोसावी यांनी तात्काळ वन गुन्हे अन्वेषण रजिस्टर क्रमांक अन्वये गुन्हा दाखल केला असून गुन्हेगारांचा शोध सुरू केला आहे.

Comments are closed.