एनसीईआरटी, सरकारविरोधात 7 जूनला मुंबईत महाआंदोलन, मराठा साम्राज्याचा इतिहास पुस्तकातून हटवण्याचा वाद; हजारो शिवप्रेमी आझाद मैदानात धडक देणार
मराठा साम्राज्याचा गौरवशाली नकाशा पाठ्यपुस्तकातून वगळणाऱ्या ‘एनसीईआरटी’विरोधात महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पुणे, सांगली, सातारा अशा विविध जिह्यांत जोरदार निदर्शने झाल्यानंतर आता सरकारला जाग आणण्यासाठी मुंबईत महाआंदोलन केले जाणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवप्रेमी मावळे, इतिहासप्रेमी येत्या 7 जूनला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर धडकणार आहेत. यावेळी महाराष्ट्रद्वेष्ट्या एनसीईआरटीसह केंद्र आणि राज्य सरकारच्या अनास्थेचा जाहीर निषेध करण्यात येणार आहे.
इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा 22 पानांचा इतिहास आणि त्यासोबत ‘अटक ते कटक’ पसरलेल्या मराठा साम्राज्याचा नकाशा समाविष्ट करण्यात आला होता. हा नकाशा भौगोलिक सीमांच्या पलीकडे हिंदुस्थानचा गौरवशाली इतिहास व स्वाभिमानाचे प्रतीक होता. राजस्थानमधील राजघराणे आणि तेथील काही लोकांच्या दबावामुळे मराठा साम्राज्याचा नकाशा पाठ्यपुस्तकातून हटवण्यात आला आहे. या माध्यमातून मराठा इतिहास व महाराष्ट्राच्या अस्मितेचा मोठा अवमान करण्यात आल्याचा आरोप शिवप्रेमींनी केला आहे. त्याच भावनेतून राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. हजारो शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमी 7 जूनला आझाद मैदानावर धडक देऊन एनसीईआरटी, दोन्ही सरकारचा जाहीर निषेध करणार आहेत. मराठा साम्राज्याचा गौरवशाली नकाशा पुन्हा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी जाहीर सभेतून आवाज उठवण्यात येणार आहे.
NCERT कामाच्या अजेंड्यानुसार
राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च शैक्षणिक संस्था असलेली एनसीईआरटी ही कोणत्याही ऐतिहासिक तथ्यांवर किंवा पुराव्यांवर काम करत नसून विशिष्ट प्रांतातील लोकांचा दबाव आणि राजकीय अजेंडय़ाखाली काम करीत आहे. त्यातूनच इतिहासाची तोडफोड केली जात आहे, असा दावा इतिहासप्रेमी ऋषिकेश निकम यांनी केला.
मेहेंदळे यांच्या निधनाचा गैरफायदा
ज्यावेळी एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा इतिहास आणि अधिकृत नकाशा समाविष्ट केला होता त्यावेळी त्या समितीत ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे यांचा समावेश होता. मात्र त्यांचे निधन झाल्यानंतर अवघ्या महिनाभरातच एनसीईआरटीने नकाशा पाठ्यपुस्तकातून हटवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातून कोणीही सक्षम आक्षेप घेऊ नये याच हेतूने लगेचच बनवाबनवी करण्यात आली, असा आरोप ऋषिकेश निकम यांनी केला.
कायदेशीर लढा
इतिहासप्रेमी ऋषिकेश निकम आणि आशीष इंगळे यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत एनसीईआरटीकडे विचारणा केली होती. त्यावेळी त्यांच्याकडे नकाशा वगळण्यासाठी कोणतेही ठोस ऐतिहासिक पुरावे नसल्याचे समोर आले. राजस्थानच्या काही राजघराण्यांचा विरोध व दबावापोटी नकाशा काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. 1752 चा अहमदिया करार, ब्रिटिश गॅझेटिअर्स आणि राजपुताना गॅझेटिअर्स यांसारख्या अधिकृत ऐतिहासिक पुराव्यांकडे दुर्लक्ष करून एनसीईआरटीने निर्णय घेतला. त्याविरोधात राजे मुधोजी भोसले, रवींद्र दादा पडवळ, ऋषिकेश निकम, अथर्व मारणे, शिवाजीराजे जाधवराव, कुणालराजे मालुसरे, रघुजीराजे आंग्रे आणि रामनारायण मराठा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
राज्य सरकारच्या पत्राला केंद्राकडून केराची टोपली
एनसीईआरटीच्या निर्णयाविरुद्ध नागपूरचे आमदार नितीन राऊत, आमदार अभिजित वंजारी, कोल्हापूरचे आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी विधिमंडळात वेळोवेळी आवाज उठवून सरकारला धारेवर धरले. त्यानंतर शिक्षणमंत्री पंकज भोयर यांनी राज्य सरकारने एनसीईआरटीला पत्र पाठवल्याचे कळवले. सुरुवातीला एनसीईआरटीने केवळ उर्दू व हिंदी माध्यमाच्या पुस्तकांतून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला होता; परंतु राज्य सरकारने पत्र पाठवल्यानंतर केंद्राने त्याची दखल घेण्याऐवजी इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकातूनही तो नकाशा काढला. यातून राज्य सरकारच्या पत्राला केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट झाले.
Comments are closed.