गुगलचा अनोखा प्रयोग! कोट्यवधी डास सोडून रोखणार घातक आजारांचा प्रसार
गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट एक अनोखा प्रयोग राबवण्याच्या तयारीत आहे. डासांमुळे पसरणाऱ्या धोकादायक आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी, कंपनीने अमेरिकेतील फ्लोरिडा आणि कॅलिफोर्निया राज्यांमध्ये पुढील दोन वर्षांत तब्बल 3.2 कोटी विशेष पद्धतीने तयार केलेले डास सोडण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यासाठी अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण एजन्सीकडे (EPA) मंजुरी मागण्यात आली असून सध्या या प्रस्तावावर विचार सुरू आहे. हा उपक्रम अल्फाबेटच्या जीवन विज्ञान क्षेत्रातील उपकंपनी वेरलीच्या ‘डीबग’ (Debug) प्रकल्पांतर्गत राबवला जात आहे. डासांमुळे पसरणारे वेस्ट नाईल व्हायरस आणि सेंट लुईस एन्सेफलायटीससारखे आजार रोखणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेत ‘वोल्बाकिया’ नावाच्या नैसर्गिक जिवाणूंनी संक्रमित केलेले नर डास मोठ्या प्रमाणावर तयार केले जातात. हे नर डास जंगलातील सामान्य मादी डासांशी संयोग साधतात. मात्र, या संयोगातून निर्माण होणारी अंडी विकसित होत नाहीत आणि त्यातून नवीन डास जन्माला येत नाहीत. परिणामी त्या परिसरातील डासांची संख्या कालांतराने कमी होऊ लागते.
विशेष बाब म्हणजे नर डास माणसांना चावत नाहीत. त्यामुळे कोट्यवधी डास सोडले जाणार असले तरी नागरिकांना अतिरिक्त त्रास होणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. असे वृत्त टाइम्स आॅफ इंडिया वेबने दिले आहे. या मोहिमेचे लक्ष्य ‘क्युलेक्स’ प्रजातीचे डास आहेत. हे डास वेस्ट नाईल व्हायरस आणि सेंट लुईस एन्सेफलायटीस यांसारख्या गंभीर आजारांचे प्रमुख वाहक मानले जातात. अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (CDC) माहितीनुसार, वेस्ट नाईल हा देशातील सर्वाधिक आढळणारा डासजन्य आजार आहे.
या प्रकल्पामागे आधुनिक तंत्रज्ञानाचीही मोठी भूमिका आहे. नर आणि मादी डासांची अचूक निवड करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), स्वयंचलित रोबोट्स आणि विशेष वितरण यंत्रणांचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे लाखो डासांचे उत्पादन आणि नियंत्रण प्रभावीपणे करता येणार आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास, पहिल्या वर्षी फ्लोरिडा आणि कॅलिफोर्नियामध्ये प्रत्येकी 1.6 कोटी डास सोडले जातील. त्यानंतर दुसऱ्या वर्षीही तितक्याच संख्येने डास सोडून प्रयोगाचा विस्तार करण्यात येईल. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास डास नियंत्रणाच्या क्षेत्रात नवे पर्व सुरू होऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments are closed.