Nanded News – शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात रात्री मुसळधार पाऊस, मुदखेड तालुक्यात केळीच्या बागा उद्ध्वस्त, उमरीत जनावरे दगावली

नांदेड शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात काल रात्री दहाच्यानंतर तर काही ठिकाणी रात्री आठच्या नंतर एक तास मुसळधार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला. पण या पावसाने उमरी येथे काही जनावरे दगावली तर, मुदखेड व परिसरातील केळीच्या बागा वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने उदध्वस्त झाल्या आहेत.

नांदेड शहर आणि जिल्ह्यात काल रात्री पाऊस झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. नांदेड शहरात काल रात्री साडेनऊ ते अकरा वाजेपर्यंत दीड तास पाऊस झाला. यामुळे शहरातील वेगवेगळ्या भागातील बत्ती गूल झाली. अनेक भागातला वीजपुरवठा आज सकाळी सुरू झाला. शहरात काही ठिकाणी रस्त्याची कामे सुरु झाल्याने या पावसाने काही ठिकाणी चिखल झाला असून निसरडे रस्ते झाल्याने वाहनांना याचा त्रास सहन करावा लागला. तरोडा, आनंदनगर, वसंतनगर, मोर चौक, वाडी आदी भागात रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. नांदेड शहरासह उमरी, कंधार, लोहा, मुदखेड, अर्धापूर या भागालाही पावसाने झोडपले.

बोळसा शिवारात वीज पडून एक गाय व आठ शेळया ठार

उमरी-उमरी तालुक्यातील काही भागात १ जून सोमवारी रात्री आठच्या सुमारास मोसम पूर्व अवकाळी वादळी वार्‍यासह पाऊस झाला. मौजे बोळसा बु. येथील शेतकरी संतोष बाळोजी चिकटवाड यांचे शेत गट नंबर २६ मधील शेतात बांधलेल्या आठ शेळ्या व एक गाय यांच्यावर वीज पडल्याने एकूण नऊ जनावरे ठार झाली आहेत.

सोमवारी रात्री आठ वाजता उमरी तालुक्यातील अनेक भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यातच बोळसा येथे वीज पडून एक गाय व आठ शेळ्या ठार झाल्या आहेत. शेतकरी संतोष बाळोजी चिकटवाड यांची अत्यंत गरिबी परिस्थिती असून जेमतेम परिस्थितीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या शेतकर्‍यांवर नैसर्गिक आपत्तींमुळे संकट उभारले आहे. शासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना मदत करावी, अशी मागणी होत आहे.

मुदखेड-गेल्या आठवड्यापासून परिसरात सुरू असलेल्या सातत्यपूर्ण वादळ वार्‍याने मुदखेड शहरासह ग्रामीण भागाला मोठा फटका दिला आहे. या नैसर्गिक आपत्तीत तोंडाशी आलेले केळीचे पीक संपूर्णपणे कोलमडून पडल्याने शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे आधीच संकटात असलेला बळीराजा पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे.

मुदखेड शहरासह परिसरातील ईजळी, निवघा, शेंबोली, बारड आणि इतर शेजारील गावांमध्ये वादळी वार्‍याने प्रचंड धुमाकूळ घातला. काढणीच्या उंबरठ्यावर आलेली केळीची पिके या वेगवान वार्‍याचा मारा सहन करू शकली नाहीत आणि शेताच्या शेतात केळीच्या बागा भुईसपाट झाल्या.

या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका मुदखेड येथील शेतकरी चंद्रकांत उर्फ बाळू चंद्र यांना बसला आहे. त्यांच्या मळ्यातील संपूर्ण केळीची बाग वादळामुळे जमिनीवर आडवी झाली आहे. वर्षभराची मेहनत आणि गुंतवलेले लाखो रुपये एका झटक्यात मातीमोल झाल्यामुळे चंद्रकांत चंद्रे यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे.

Comments are closed.