गोव्याची सव्वा कोटीची दारू सिंगापूरमध्ये जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
पुरंदरमध्ये गोवा दारू जप्त महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड पथकाने पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात एक अत्यंत मोठी आणि धडक कारवाई केली आहे. गोवा राज्यात विक्रीसाठी अधिकृत असलेला, परंतु महाराष्ट्रात विक्रीसाठी पूर्णपणे प्रतिबंधित असलेला तब्बल 1कोटी 27 लाख 54 हजार 600 रुपयांचा विदेशी मद्यसाठा पुरंदर पोलिसांनी आणि उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे.
पुरंदर तालुक्यातील सिंगापूर गावच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणी एका आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या कारवाईत एका मोठ्या सहाचाकी कंटेनरसह लाखो रुपयांचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले असून या मोठ्या तस्करीचा पर्दाफाश झाला आहे.
Singapore Village Raid : संशयास्पद कंटेनर अडवला; 180 मिलीचे 1290 बॉक्स जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, गोवा राज्य निर्मित मद्याची महाराष्ट्रात अवैधरीत्या मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जात आहे. या माहितीच्या आधारे सासवड पथकाने पुरंदर तालुक्यातील बेलसर-वाघापूर मार्गावर नाकाबंदी करून वाहनांची कडक तपासणी सुरू केली होती.
नाकाबंदी सुरू असतानाच सिंगापूर गावच्या हद्दीत असलेल्या ‘हॉटेल दोस्ती’समोर एक संशयित सहाचाकी कंटेनर आला. पथकातील जवानांनी कंटेनर थांबवून वाहन चालकाकडे चौकशी केली असता त्याने पोलिसांना अत्यंत संशयास्पद उत्तरे दिली.
चालकाच्या बोलण्यावर संशय आल्याने जवानांनी संपूर्ण वाहनाची सखोल तपासणी केली. या तपासणी दरम्यान कंटेनरच्या आत लपवून ठेवलेला गोवा राज्य निर्मित ‘रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की’ (Royal Blue Malt Whisky) या नामांकित ब्रँडच्या 180 मिली क्षमतेच्या बाटल्यांचे तब्बल 1290 बॉक्स आढळून आले.
State Excise Department Action : 1 कोटी 27 लाखांचा मुद्देमाल जप्त; एक तस्कर अटकेत
जप्त करण्यात आलेल्या या अवाढव्य मद्यसाठ्याची निव्वळ बाजारपेठ किंमत 1 कोटी 11 लाख 45 हजार 600 रुपये इतकी आहे. याशिवाय, दारूची बेकायदेशीर वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ‘एलपीटी-1615’ (Tata LPT-1615) मॉडेलचा सहाचाकी कंटेनर, दोन महागडे मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण 1 कोटी 27 लाख 54 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल शासनाने जप्त केला आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करून कंटेनर चालकाला अटक करण्यात आली असून, गोव्यातून हा एवढा मोठा दारूचा साठा कोणी पाठवला आणि तो महाराष्ट्रात कुठे वितरित केला जाणार होता, याचा सखोल तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सासवड पथक करत आहे. या मोठ्या कारवाईमुळे मद्य तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
ही बातमी वाचा:
Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!
Comments are closed.