‘मी नव्हे तर यशोमती ठाकूरच भाजपला मॅनेज’; काँग्रेसच्या हर्षजीत देशमुखांचा पलटवार, रुग्णालयातून
Amravati Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या (Legislative Council) अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राजकीय घडामोडींना आता अत्यंत नाट्यमय वळण मिळाले आहे. काँग्रेसचे (Congress) उमेदवार हर्षजीत देशमुख यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे आणि अचानक वैद्यकीय कारणास्तव नागपूर येथील रुग्णालयात दाखल होण्यावरून काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा आहे. “हर्षजीत देशमुख यांनी 15 ते 20 कोटी रुपये घेतल्याची चर्चा आहे, या निवडणुकीत मोठा घोडेबाजार झाला असून संपूर्ण यंत्रणाच भ्रष्ट केली जात आहे”, असा थेट आणि गंभीर आरोप ठाकूर यांनी केला आहे. आता यशोमती ठाकूर यांच्या आरोपांवर हर्षजीत देशमुख यांनी थेट उत्तर दिले आहे.
Harshjit Deshmukh: नेमकं काय म्हणाले हर्षजीत देशमुख?
नागपुरात रुग्णालयात दाखल असलेल्या हर्षजीत देशमुख यांनी यशोमती ठाकूर यांच्या आरोपांवर उत्तर देताना म्हटले की, मला भेटायला काँग्रेसच्या वीरेंद्र जगताप यांच्या सारख्या मोजक्या नेत्यांशिवाय कोणीही आले नाही. माझ्या तब्येतीची माहिती न घेता माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणे चुकीचे आणि दुर्दैवी आहे. यशोमती ठाकूर यांनी कोणतीही माहिती न घेता आरोप केले आहेत. मी मॅनेज होणारा व्यक्ती नाही. कदाचित यशोमती ठाकूर याच भाजपला मॅनेज झाल्या आहेत. त्यांना काँग्रेसचे नुकसान करून भाजपला फायदा पोहोचवायचा आहे, असा पलटवार त्यांनी केलाय.
हर्षजीत देशमुख पुढे म्हणाले की, मी निवडणुकीतून माघार घेतलेली नाही आणि घेणारही नाही. काँग्रेस अमरावतीमध्ये वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे ऐकले आहे. काँग्रेस नेत्यांना जे ठरवायचे आहे ते ठरवू द्या, मी निवडणुकीत कायम असून मतदारांशी डिजिटल माध्यमातून संपर्क ठेवत आहे. मला डिस्चार्ज मिळायला अजून एक ते दोन दिवस लागतील. त्यानंतर दोन दिवस विश्रांती घेऊन अमरावतीत प्रत्यक्ष जाऊन मतदारांशी संपर्क साधणार आहे. यशोमती ठाकूर माझीच नाही तर काँग्रेस पक्षाचीही बदनामी करत आहेत, असा आरोप देखील त्यांनी केलाय. आता या आरोपावर यशोमती ठाकूर काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Yashomati Thakur: यशोमती ठाकूर यांचेही प्रत्युत्तर
यानंतर यशोमती ठाकूर म्हणाल्या की, जर तुम्ही तयार असाल तर चला मैदानात या. उद्या या आणि प्रचाराची सुरुवात करा. निवडणुकीला चार-पाच दिवस राहिलेले आहेत. बाहेर निघा, हॉस्पिटलमध्ये राहून कशासाठी नाटक करत आहात? त्यांचे सगळे स्टेटमेंट हे भाजपाला कसा फायदा होईल असेच आहेत. ही चिड येण्यासारखी गोष्ट आहे. त्यांच्यात दम असेल तर त्यांनी तयारीपूर्वक यावे आणि निवडणूक लढवावी. डिजिटल माध्यमातून प्रचार हा एक बालिशपणा आहे, असे त्यांनी म्हटले.
Amravati Vidhan Parishad Election 2026: काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची अमरावतीत महत्त्वाची बैठक
दरम्यान, अमरावती विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख भाजपसोबत ‘मॅनेज’ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ते जिल्हाध्यक्षांसह पक्षातील प्रमुख नेत्यांच्या संपर्कात नसल्याने त्यांच्यावर विविध आरोप होत आहेत. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी हर्षजित देशमुख यांनी कोट्यवधी रुपये घेऊन मॅनेज झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीत पुढील भूमिका काय असावी, कोणाला पाठिंबा द्यायचा यावर चर्चा करण्यासाठी आज यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, खासदार बळवंत वानखेडे यांच्यासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची अमरावतीत महत्त्वाची बैठक होणार आहे.
आणखी वाचा
अभिजीत दिपके झुरळ जनता पार्टी पीसी : आता मी एक नाही, लाखो तरुण माझ्यासोबत आहेत : अभिजीत दिपके
Comments are closed.