म्हाडा घोटाळ्यात ‘सुप्रीम’ कारवाईची भीती दाखवून गीते बंधूंचे बंड थंड? राज्य सरकारच्या ‘त्या’ पत
नाशिक विधान परिषद निवडणूक 2026: नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते (Gokul Gite) यांच्या माघारीच्या चर्चांना वेग आला असतानाच आता या संपूर्ण घडामोडींमध्ये ‘दबाव तंत्र’ वापरले जात असल्याचा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. महायुतीच्या नेत्यांकडून सुरू असलेली मनधरणी आणि दुसरीकडे गोकुळ गीते यांचे बंधू गणेश गीते यांच्या प्रकरणात झालेला पत्रव्यवहार यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या आठ दिवसांपासून गोकुळ गीते यांच्या माघारीसाठी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. गोकुळ गीते यांची उमेदवारी कायम राहिल्यास महायुतीच्या अधिकृत उमेदवारास फटका बसू शकतो, अशी राजकीय गणिते मांडली जात आहेत. त्यामुळे गीते यांची मनधरणी सुरू असल्याचे बोलले जात असतानाच काही राजकीय वर्तुळातून ‘दबाव तंत्र’ वापरले गेले का? असा सवाल उपस्थित होत आहे.
या चर्चेला कारण ठरले ते राज्य सरकारच्या कायदेशीर सल्लागार सहसचिवांनी अतिरिक्त सरकारी वकील, उच्च न्यायालय यांना पाठवलेले एक पत्र. या पत्रामध्ये गोकुळ गीते यांचे बंधू गणेश गीते यांना नाशिकमधील म्हाडा प्रकरणात उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या अटकपूर्व जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या सूचना करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, गोकुळ गीते आणि गणेश गीते यांनी 1 जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याच दिवशी राज्याच्या कायदेशीर सल्लागार सहसचिवांचे गणेश गीते यांच्या जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याबाबतचे पत्र रिसीव्ह झाल्याचे समोर आले आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे हे पत्र 7 मे 2026 रोजी तयार करण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी ते 1 जून रोजी प्राप्त झाल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
यामुळे गणेश गीते यांच्या कायदेशीर प्रकरणाचा आणि गोकुळ गीते यांच्या संभाव्य माघारीचा काही संबंध आहे का? गोकुळ गीते यांना आज मिळणारा पाठिंबा आणि माघारीसाठी सुरू असलेले प्रयत्न हे केवळ राजकीय मनधरणीचा भाग आहेत की दबावाचे राजकारण, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. मात्र, या सर्व घडामोडींवर गीते बंधू किंवा महायुतीतील वरिष्ठ नेत्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
Nashik Vidhan Parishad Election 2026: गोकुळ गीतेंच्या देहबोलीची चर्चा
दरम्यान, शिवसेनेचे संकटमोचक मानले जाणारे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) हे विशेष विमानाने नाशिकमध्ये दाखल झाले असून, ते थेट गणेश गिते आणि गोकुळ गिते यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. तर गिरीश महाजन देखील गीते बंधूंच्या घरी दाखल झाले आहेत. मंत्री उदय सामंत हे गणेश गिते यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर तिथे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे आणि आमदार किशोर दराडे हे देखील उपस्थित होते. मात्र, जिथे मंत्री उदय सामंत, गणेश गिते, गोकुळ गिते आणि शिवसेनेचे इतर प्रमुख पदाधिकारी चर्चा करत होते, तिथून बाजूला म्हणजेच दुसऱ्या खोलीत दराडे बंधू बसून होते. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
सुमारे आठ दिवस रंगलेल्या या मनधरणी नाट्यानंतर गोकुळ गिते यांनी माघार घेण्याची तयारी दर्शवली असली, तरी त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बरेच काही सांगून जात होते. बैठकीदरम्यान गोकुळ गिते यांची देहबोली अत्यंत शांत आणि काहीशी संथ पाहायला मिळाली. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नाराजी जाणवत होती. त्यामुळे गोकुळ गिते हे स्वेच्छेने मागे हटत आहेत की केवळ ज्येष्ठ मंत्र्यांचा शब्द राखण्यासाठी आणि वरिष्ठांच्या दबावामुळे हा निर्णय घेत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आणखी वाचा
अभिजीत दिपके झुरळ जनता पार्टी पीसी : आता मी एक नाही, लाखो तरुण माझ्यासोबत आहेत : अभिजीत दिपके
Comments are closed.