अखेर गोकुळ गीतेंचं बंड शमवण्यात महाजन-उदय सामंतांना यश, विधान परिषद निवडणुकीतून घेतली माघार
नाशिक विधान परिषद निवडणूक 2026: नाशिक विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचे (Mahayuti) अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांच्यासमोरील सर्वात मोठे संकट अखेर टळले आहे. महायुतीसमोर तगडे आव्हान उभे करणारे भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते (Gokul Gite) यांनी अखेर आपली बंडाची तलवार म्यान केली आहे. मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या मध्यस्थीनंतर गीते बंधूंच्या निवासस्थानी झालेल्या चहापानानंतर हा समेट घडवून आणण्यात यश आले. या निर्णयानंतर आता नाशिक विधान परिषदेत महायुतीचे केवळ नरेंद्र दराडे हेच एकमेव अधिकृत उमेदवार रिंगणात असणार आहेत.
Nashik Vidhan Parishad Election 2026: बैठकीत नाराजीनाट्य आणि मंत्र्यांचा दराडेंना दम
कालावधी मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आज दोन्ही मंत्री थेट नाशिकमधील गिते बंधूंच्या निवासस्थानी दाखल झाले. तत्पूर्वी झालेल्या बंद दाराआड बैठकीत काही काळ प्रचंड तणाव पाहायला मिळाला. गोकुळ गिते यांनी बैठकीत अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. “सर्व मतदार माझ्या बाजूने आहेत, मग वातावरण माझ्यामुळे बिघडले आहे का?” असा सवाल करत त्यांनी गिते कुटुंबाबाबत आक्षेपार्ह विधाने करणाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. गोकुळ गिते यांची नाराजी लक्षात घेता दोन्ही मंत्र्यांनी त्यांची समजूत घातली. तसेच भविष्यात वादग्रस्त वक्तव्ये टाळण्याचा सज्जड दम मंत्र्यांनी दराडे कुटुंबीयांना दिला. त्यानंतर गोकुळ गिते यांनी आपला निवडणूक प्रचार थांबवण्याचा (मोठा निर्णय घेतला.
Nashik Vidhan Parishad Election 2026: पत्रकार परिषदेत गिरीश महाजन यांचा खुलासा
बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषदेत (Press Conference) गोकुळ गिते आणि नरेंद्र दराडे हे दोघेही एकमेकांच्या शेजारी बसले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, “याला राजकीय ड्रामा म्हणता येणार नाही तर ओढाताण सुरू होती. नाशिकची जागा शिवसेना शिंदे गटाला दिली. गणेश गीते यांनी ती जागा मागितली होती. नरेंद्र दराडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यानंतर जागा शिवसेनेला सुटली. आता सर्व चर्चा मिटल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चर्चा झाली आहे. आम्ही गीतेंना कोणतीही कमिटमेंट केली नाही. त्यांनीही तशी मागितली नाही. त्यांचा भविष्यात विचार केला जाईल. चांगली चर्चा झाली, त्यामुळे गोकुळ गीते यांची माघार झाली. दराडे यांना बहुमताने निवडून द्यायचे आहे. गीते कोणत्याही नोटीसला घाबरत नाहीत. म्हाडाचा विषय न्यायप्रविष्ट आहे. तो नोटीसचा विषय छोटा आहे. गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा. आता एकच उमेदवार महायुतीचा राहणार तो म्हणजे नरेंद्र दराडे. आमचा आमच्या नगरसेवकांवर विश्वास आहे,” असे त्यांनी म्हटले.
Nashik Vidhan Parishad Election 2026: दराडेंचा मार्ग सुकर
दरम्यान, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अधिकृत दिवस आधीच उलटून गेल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या गोकुळ गीते यांचे नाव मतपत्रिकेवर कायम राहणार आहे. त्यामुळे मतदान आणि मतमोजणीची ही संपूर्ण प्रक्रिया प्रशासनाला पार पाडावीच लागणार आहे. परंतु, गोकुळ गीते यांनी अधिकृतपणे आपला प्रचार थांबवून नरेंद्र दराडे यांना सक्रिय पाठिंबा जाहीर केल्यामुळे, महायुतीच्या मतांची होणारी फाटाफूट आता पूर्णपणे टळली आहे. गीते यांच्या या माघारीमुळे महायुतीचे पारडे जड झाले असून नरेंद्र दराडे यांच्या विजयाचा मार्ग आता सुकर झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा
अभिजीत दिपके झुरळ जनता पार्टी पीसी : आता मी एक नाही, लाखो तरुण माझ्यासोबत आहेत : अभिजीत दिपके
Comments are closed.