लोकल ट्रेनमध्ये सीटवर बसण्यावरून उफाळला वाद, तरुणावर प्राणघातक हल्ला; सीएसएमटी-खोपोली लोकलमध्ये

रायगड क्राईम न्यूज: मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांची गर्दी आणि वाद काही नवीन नाहीत. आता सीटवर बसण्याच्या अगदी किरकोळ कारणावरून एका प्रवाशावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कर्जत रेल्वे पोलिसांनी (Karjat Railway Police) अवघ्या 12 तासांच्या आत दोन मुख्य आरोपींना अटक (Arrested) केली असून, त्यांचा एक साथीदार अद्याप फरार आहे. सतीश कुमार बोलामनी पाठक (वय 26, रा. मस्जिद बंदर, मुंबई) असे या चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या फिर्यादी प्रवाशाचे नाव आहे. तर इब्रान इद्रिस अन्सारी (वय 18, रा. नेरळ) आणि करण कन्हैयालाल अग्रवाल (वय 22, रा. शेलू) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Raigad Crime News: धावत्या लोकलच्या लगेज डब्यात वाद

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीश कुमार पाठक हे गुरुवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सीएसएमटी ते खोपोली (CSMT to Khopoli) दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या लगेज डब्यातून प्रवास करत होते. लोकल ट्रेनने वांगणी रेल्वे स्थानक (Wangani Railway Station) पार केल्यानंतर, डब्यात सीटवर बसण्याच्या कारणावरून पाठक यांचा तिथेच उपस्थित असलेल्या काही तरुणांशी किरकोळ वाद झाला.

Raigad Crime News: पोटात चाकू खुपसला; शिवीगाळ अन् मारहाण

हा वाद काही वेळातच अत्यंत विकोपाला गेला आणि त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. रागाच्या भरात आरोपींनी सतीश कुमार पाठक यांना बेदम मारहाण आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान एका आरोपीने आपल्या जवळील धारदार चाकूने थेट पाठक यांच्या पोटात वार केले. धावत्या लोकलमध्ये घडलेल्या या रक्तरंजित प्रकारामुळे डब्यातील इतर प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली.

Raigad Crime News: सीसीटीव्हीच्या आधारे 12 तासांत आरोपी जेरबंद

या घटनेनंतर जखमी प्रवाशाच्या तक्रारीवरून कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे (CCTV Cameras) फूटेज तपासण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. कर्जत रेल्वे पोलिसांनी नेरळमधील ममदापूर परिसरातून इब्रान अन्सारी आणि करण अग्रवाल या दोघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीनंतर दोघांना अटक करण्यात आली.

Raigad Crime News: एक आरोपी अद्याप फरार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात सामील असलेला त्यांचा तिसरा साथीदार सिद्धार्थ गायकवाड (रा. नेरळ) हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. मात्र, लोकल प्रवासातील वाढत्या गुन्हेगारीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रेल्वे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Chhatrapati Sambhajinagar Crime: कोर्टाने घराचा ताबा दिला, अन् तासाभरातच पोटच्या मुलाने 84 वर्षीय वडिलांचा काढला काटा; छ. संभाजीनगरमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Comments are closed.