सोलापुरात भाजपला पाठिंबा, राष्ट्रवादीच्या तीन आमदारांवर कारवाई? शशिकांत शिंदे म्हणाले…
सोलापूर : राज्याचं लक्ष लागलेल्या सोलापूर (Solapur) विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या चार आमदारांपैकी (MLA) तीन आमदारांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीला हजर राहून आपला पाठिंबा जाहीर केला होता. आता या बंडखोर आमदारांबाबत निवडणुकीनंतर पक्षाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant shinde) यांनी सांगितले आहे. सोलापूरमध्ये महायुतीचे राजेंद्र राऊत विरुद्ध महाविकास आघाडीचे वसंतराव देशमुख यांच्यात लढत होत आहे. येथील निवडणूक बिनिवरोध करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरेंनी प्रयत्न केले. मात्र, खासादर धैर्यशील मोहिते पाटलांच्या पुढाकाराने ही निवडणूक लागली आहे.
सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत ही जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसला देण्यात आली होती. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने ऐनवेळी निवडणूक बिनविरोध न करण्यासाठी वसंतराव देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. त्यासाठी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे, आमच्याकडे 600 अदृश्य मतं असल्याचा दावाही त्यांनी निवडणूक प्रचाराच्या काळात केला आहे. मात्र, धैर्यशील मोहिते पाटील एकाकी पडल्याचं दिसून येत आहे. कारण, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील तीन आमदारांनी भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा दिला आहे.
येथील निवडणुकीसाठी माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर देखील इच्छुक होते. त्यामुळे त्यांची नाराजी होती. दुसरे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी पंचायत समिती निवडणुकीची नाराजी बोलून दाखवली. वसंतराव देशमुख यांनी पंचायत समितीवेळी भाजपला मदत केल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, पक्षात असणारे मतभेद बाहेर बोलणे किंवा दुसऱ्या पक्षात जाऊन मदतीबाबत आश्वासन देणे योग्य नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले आहे.
विधानपरिषद निवडणुकीत आता पक्षाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या आमदारांना पक्षाच्या उमेदवारासोबत राहण्याच्या सूचना दिल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे. मात्र, कारवाईबाबत आपण आत्ता काही बोलणार नसून निवडणुकीनंतर पवार साहेब आणि सुप्रिया ताई यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, आता पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात भाजपसोबत उघडपणे जाणारे शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर आमदार अभिजीत पाटील आणि आमदार नारायण पाटील यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार हे निवडणुकीनंतर समोर येणार आहे.
हेही वाचा
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Comments are closed.