ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, ठाकरेंचे डावपेच बघूनच शिंदेंचे पुढचे पाऊल; सूत्रांची माहिती

मुंबई : शिवसेनेचं ऑपरेशन टायगर हे यशस्वी झालं असून काही तांत्रिक अडचणींमुळे त्याचे पुरावे समोर आणले नाहीत, मात्र ठाकरेंचे कायदेशीर डावपेच बघूनच पुढची पावलं टाकली जातील, असं शिंदेंच्या शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आलं आहे. तशी माहिती सूत्रांनी दिली. येत्या दोन दिवसात तरी अधिकृतरित्या काहीही समोर आणलं जाणार नाही, अशी माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटल्याचा दावा केला जात आहे. या सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सह्यांचं पत्र दिलं असल्याचीही चर्चा होती. मात्र त्याचवेळी शिंदेंच्या शिवसेनेकडे सहा खासदार गेले नाहीत, दोन खासदारांनी पाठिंब्याच्या पत्रावर सह्या केल्या नाहीत, असा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आला.

ऑपरेशन टायगर झालं असेल तर त्याचे पुरावे काय? तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांप्रमाणे शिवसेनेच्या खासदारांचे फोटो का समोर आले नाहीत? तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना त्यांनी जर पत्र दिलं असेल तर ते समोर का आणलं जात नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेच्या सूत्रांनी एबीपी माझाला माहिती दिली. आज झालेले ऑपरेशन टायगर हे फुलप्रुफ असून त्यात काहीही अडचण नाही. त्याबाबत मात्र आता लगेच काहीही जाहीर करायचं नाही, कोणतेही पुरावे समोर आणायचे नाहीत असं शिंदेंच्या शिवसेनेनं ठरवलं आहे. यामागे काही तांत्रिक गोष्टी आहेत. ठाकरे गट काय कायदेशीर डावपेच आखतो त्यावर पुढची पावलं टाकली जातील असं शिंदेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
त्यामुळे ऑपरेशन टायगरवर पुढील दोन दिवस तरी काहीही अधिकृतरित्या समोर आणलं जाणार नाही अशी माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक

दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेकडून  संसदीय दलाची बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठकच खासदारांची एकनिष्ठतेची लिटमस टेस्ट ठरणार आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीत ही बैठक पार पडणार आहे. शिंदेंसोबत सहा खासदार नसल्याचा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. गुरुवारच्या बैठकीत किती खासदार आणि कोणते खासदार येतात यानंतरच ठाकरेंच्या शिवसेनेची पुढील भूमिका ठरणार आहे. सहापैकी दोन खासदारांनी त्यांची आश्वासनं पूर्ण झाली नसल्याने सहीच केली नसल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येतोय. त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी झालं की नाही ? हे दोन्ही गटाकडून अद्याप अधिकृतरित्या समोर आलेले नाही.

कोणते खासदार फुटल्याचा दावा?

1. संजय जाधव (परभणी)

2. संजय देशमुख (यवतमाळवाशिम)

3. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)

4. ओमराजे निंबाळकर (धाराशिव)

5. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)

6. संजय दीना पाटील (ईशान्य मुंबई)

ही बातमी वाचा:

Comments are closed.