टी 20 विश्वचषकात भारत-पाकिस्तानचा अनोखा योगायोग! शफाली वर्मा आणि फातिमा सना यांची रेकॉर्डबूकमध्ये नोंद

इंग्लंड आणि वेल्समध्ये सध्या आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ चा स्पर्धा सुरू आहे. यामध्ये भारताची सुरूवात उत्तम झाली आहे. भारताने खेळलेले दोन्ही सामने जिंकले असून पाकिस्तानची स्थिती मात्र थोडी वेगळी आहे. असो, दोन्ही संघांनी बुधवारी (१७ जून) त्यांचा साखळी सामना खेळला, ज्यामध्ये भारताच्या शफाली वर्मा आणि पाकिस्तान फातिमा सना यांनी उत्तम कामगिरी करत एक विशिष्ठ यादीत प्रवेश केला आहे.

शफाली आणि फातिमाने महिला टी२० विश्वचषकाच्या एकाच सामन्यात अर्धशतक ठोकून तीन विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला आहे. दोघींनी १७ जून रोजी आपापल्या संघाकडून खेळताना ही कामगिरी केली. या दिवशी भारताचा सामना नेदरलॅंड्सशी झाला. त्यामध्ये भारताने प्रथम फलंदाजी केली. शफालीने ३८ चेंडूंत ५५ धावा केल्या आणि गोलंदाजी करताना ३ विकेट्सही घेतल्या. यामुळे महिला टी२० विश्वचषकाच्या एकाच सामन्यात अशी कामगिरी करणारी ती तिसरी खेळाडू ठरली. हा सामना भारताने ९५ धावांनी जिंकला.

भारत विरुद्ध नेदरलॅंड्स सामन्यानंतर पाकिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिकेशी झाला. या सामन्यात कर्णधार फातिमाने नाबाद ५५ धावा केल्या आणि तिनेही ३ विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्यामुळे ती या स्पर्धेच्या एकाच सामन्यात अर्धशतक करणारी आणि तीन विकेट्स घेणारी चौथी खेळाडू ठरली. हा सामना मात्र पाकिस्तानने गमावला.

शफाली आणि फातिमा यांच्याआधी अशी कामगिरी वेस्ट इंडिजच्या हेली मॅथ्यूज आणि दक्षिण आफ्रिकेच्या सुने लूस यांनी केली आहे.

महिला टी२० विश्वचषकाच्या एकाच सामन्यात ५०+ धावा आणि ३+ विकेट्स घेणारे-
(६२ आणि ३) – हेली मॅथ्यूज विरुद्ध श्रीलंका, ग्रॉस आयलेट, २०१८
(६१* आणि ३) – सुने लूस विरुद्ध थायलंड, कॅनबेरा, २०२०
(५५ आणि ३) – शफाली वर्मा विरुद्ध नेदरलँड्स, लीड्स, २०२६
(५५* आणि ३) – फातिमा सना विरुद्ध दक्षिण आफ्रिका, बर्मिंगहॅम, २०२६*

Comments are closed.