मुंबईतील खासदार फुटला, पदाधिकारी काय करणार? ठाकरेंनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक
मुंबई : सहा खासदारांनी साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी ईशान्य मुंबईतील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर आता उद्धव ठाकरे हे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी शुक्रवारी दुपारी 12 वाजता ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत ईशान्य मुंबईतील पदाधिकाऱ्यांची भूमिका काय याची विचारणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार फुटले
चार वर्षानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. गुरुवारी दिल्लीत झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाच्या बैठकीला पक्षाचा व्हीप धुडकावून 6 खासदार अनुपस्थित राहिले. हे तेच 6 खासदार आहेत जे बंडखोरी करून शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती.
या बैठकीला फक्त संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे चारच खासदार हजर होते. गैरहजर खासदारांना पक्षाने नोटीस पाठवली असून 7 दिवसांत उत्तर न दिल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.
Sanjay Dina Patil Mumbai North East MP : ईशान्य मुंबईच्या संजय दिना पाटलांची बंडखोरी
या सहा खासदारांमध्ये ईशान्य मुंबईच्या संजय दिना पाटील यांचा समावेश आहे. संजय दिना पाटील हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे. पण त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि ईशान्य मुंबईतून भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत ते निवडून आले. परंतु, आता त्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचं निश्चित केलं आहे.
मुंबईतील खासदार फुटून जाणं हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या चांगलंच जिव्हारी लागल्याचं दिसतंय. मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं मोठं कॅडर असतानाही खासदाराने बंडखोरी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र आहे.
Mumbai Operation Tiger : मुंबईतील पदाधिकारी काय करणार?
खासदारांना फोडल्यानंतर आता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची नजर ठाकरेंच्या मुंबईतील नगरसेवकांवर असल्याची चर्चा आहे. त्यातच एक खासदार गळाला लागल्याने त्या भागातील नगरसेवक, पदाधिकारी काय करणार, त्यांची भूमिका काय असेल याबद्दल तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबईतील पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. खासदाराच्या बंडखोरीनंतर पदाधिकाऱ्यांचं मत काय हे त्यामध्ये जाणून घेतलं जाणार असल्याची माहिती आहे.
ही बातमी वाचा:
Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला
Comments are closed.