IND vs AFG: चेपॉकमध्ये कोणाचे पारडे जड? तिसऱ्या वनडेपूर्वी जाणून घ्या पिच रिपोर्ट
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना शनिवारी, 20 जून रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) येथे खेळवला जाणार आहे. हा सामना दुपारी 1:30 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक दुपारी 1 वाजता होणार आहे.
भारतीय संघाने मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. त्यामुळे कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया अफगाणिस्तानचा 3-0 असा व्हाईटवॉश करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानचा संघ भारताविरुद्ध वनडे क्रिकेटमधील पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील असेल.
चेपॉकच्या खेळपट्टीचा कसा असेल स्वभाव?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील हा सामना चेपॉक स्टेडियमच्या पिच क्रमांक 4 वर खेळवला जाणार आहे. ही खेळपट्टी लाल मातीची असल्याने येथे चांगली उसळी मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे चेंडू व्यवस्थित बॅटवर येतो आणि फलंदाजांना फटकेबाजी करणे सोपे जाते.
दोन दिवसांपूर्वी चेन्नईमध्ये पावसाची हजेरी लागली होती. मात्र आता हवामान पूर्णपणे स्वच्छ आहे. सामन्यादरम्यान उष्णता आणि दमट वातावरण राहण्याचा अंदाज असून खेळाडूंच्या फिटनेसची कसोटी लागणार आहे.
चेपॉकमधील वनडे आकडेवारी
चेपॉक मैदानावर आतापर्यंत एकूण 28 वनडे सामने खेळवले गेले आहेत. त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 15 सामने जिंकले आहेत, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला 12 सामन्यांत विजय मिळाला आहे.
या मैदानावर नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावते. टॉस जिंकणाऱ्या संघाने येथे 17 सामने जिंकले आहेत. या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या 337/7, तर सर्वात कमी धावसंख्या 69 धावा इतकी आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत 6 वनडे सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारताने 5 सामने जिंकले असून एक सामना बरोबरीत सुटला होता. अफगाणिस्तानला अद्याप भारताविरुद्ध वनडे क्रिकेटमधील पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. आता चेपॉकच्या मैदानावर तिसऱ्या वनडेमध्ये दोन्ही संघ कशी कामगिरी करतात, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.