FIFA WC 2026: पेले यांचा रेकॉर्ड थोडक्यात वाचला! ब्राझीलचा मोठा विजय, 52 वर्षांनंतर विश्वचषकात खेळणारा संघ झाला बाहेर
फिफा विश्वचषक २०२६ मध्ये आज (शनिवार, २० जून) फिलाडेल्फिया स्टेडियममध्ये सी ग्रुपमधील दुसऱ्या सामन्यात ब्राझीलने हैतीचा ३-० असा मोठा पराभव केला. विश्वचषकात हे दोन संघ पहिल्यांदाच भिडले, ज्यामध्ये ब्राझीलने बाजी मारली. ब्राझीलचा हा या विश्वचषकातील पहिलाच विजय ठरला आहे. याआधी झालेला सामना (मोरोक्कोविरुद्ध) अनिर्णीत राहिला होता. तसेच या विजयाबरोबरच ते सी ग्रुपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचले आहेत, तर ५२ वर्षानंतर विश्वचषकात खेळणारा हैती बाहेर झाला आहे. हैती १९७४ नंतर विश्वचषकात खेळत होता, मात्र त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. या स्पर्धेत खेळलेले दोन्ही सामने त्यांनी गमावले आहेत.
या सामन्याची स्थिती पाहिली तर ब्राझीलने सुरूवातीपासूनच हैतीवर वर्चस्व राखले होते. त्याचा प्रभाव सामन्याच्या २३ व्या मिनिटाला दिसला. मॅथियस कुन्हाने (Matheus Cunha) आपल्या विश्वचषक कारकिर्दीतील पहिला गोल करत ब्राझीलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानेच ब्राझीलसाठी दुसराही गोल केला. ३६ व्या मिनिटाला केलेल्या या गोलमुळे पाच वेळेच्या विश्विविजेत्याची आघाडी २-० अशी भक्कम झाली. कुन्हा दिग्गज पेलेंसारखा पराक्रम करेल असे वाटत होते. ६८ वर्षांनंतर पुन्हा एकदा ब्राझिलियन फुटबॉलपटूच्या नावावर हॅट्ट्रीकची नोंद झाली असती, मात्र तसे झाले नाही.
पेले यांनी १९५८च्या विश्वचषकात फ्रान्सविरुद्धच्या सामन्यात हॅट्ट्रीक केली होती. ते या स्पर्धेत हॅट्ट्रीक नोंदवणारे सर्वात युवा खेळाडू ठरले होते आणि आताही त्यांचा हा विक्रम अबाधित आहे.
कुन्हाने तिसरा गोल केला नसला तरी ब्राझीलकडून या सामन्यातील तिसरा गोल विनिसियस ज्युनियरने केला. त्याने हा गोल पहिल्या हाफच्या अतिरिक्त वेळेत केला. हा त्याच्या या स्पर्धेच्या चालू हंगामातील दुसरा गोल तर विश्वचषक कारकिर्दीतील तिसरा गोल होता. त्याने २०२२ च्या आवृत्तीत केवळ एक गोल केला होता. आता त्याने सलग दोन सामन्यात गोल करण्याची कामगिरी केली आहे.
या विजयामुळे ब्राझीलचे दोन सामन्यांत चार पॉइंट्स झाले आहेत. दुसरीकडे याच ग्रुपमधील मोरोक्कोनेही स्कॉटलंड विरुद्धचा सामना जिंकल्याने त्यांचेही चार पॉइंट्स झाले आहेत. ते सी ग्रुपच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहेत. आता ब्राझीलचा पुढील सामना स्कॉटलंड विरुद्ध आहे.
Comments are closed.