शाळा सुरू होऊन पाच दिवस उलटले, विद्यार्थ्यांना गणवेशाचा पत्ता नाही; शिवसेना, मनसेची पालिकेवर धडक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शाळा सुरू होऊन पाच दिवस उलटले असले तरी नवी मुंबई महापालिकेच्या ८० शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत. सालाबादप्रमाणे यंदाही प्रशासनाने उशिरा गणवेश वितरणाची परंपरा कायम ठेवल्यामुळे शिवसेना आणि मनसेच्या वतीने आज महापालिका मुख्यालयावर धडक देण्यात आली.

विद्यार्थ्यांना गणवेश पुरवठा करण्याचे काम शहरातील महिला बचत गटांकडून करून घेण्याचे नियोजन होते. मात्र बचत गटांना गणवेश वेळेत देता येणार नाहीत, असा मुद्दा उपस्थित करून सत्ताधारी भाजपने महिला बचत गटांना काम देण्यास कडाडून विरोध केला. त्यामुळे हे काम जुन्याच ठेकेदाराच्या घशात घालण्यात आले. मात्र शाळा सुरू होऊन पाच दिवस उलटले असले तरी या ठेकेदाराला विद्यार्थ्यांना गणवेश देता आले नाहीत. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक आणि मनसे सैनिकांनी आज पालिका मुख्यालयावर धडक दिली.

या आंदोलनात विधानसभाप्रमुख अतुल कुळकर्णी, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, सूर्यकांत मढवी, महेश कोटीवाले, मनोज इसवे, गटनेते विशाल ससाणे, नगरसेवक विशाल विचारे, मनसेचे नगरसेवक अभिजित देसाई, विभागप्रमुख सिद्धाराम शिलवंत, माजी नगरसेविका नंदा काटे आदी सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांच्या गणवेशाला विलंब झाल्यामुळे शिवसेना आणि मनसेच्या वतीने आज महासभेत आवाज उठवला. या मुद्यावर चर्चा करण्यास महापौर सुजाता पाटील यांनी नकार दिल्यामुळे तिन्ही नगरसेवकांनी महासभेतच निदर्शने सुरू केली. त्यानंतर उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांनी विद्यार्थ्यांना गणवेश येत्या १५ जुलैपासून मिळणार असल्याची माहिती सभागृहाला दिली.

Comments are closed.