Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही

Omraje Nimbalkar and Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मध्ये ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्याची बातमी पसरल्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात टीकेची झोड उठली होती. ठाकरे गटाच्या नेत्यांनी फुटीर खासदारांवर अक्षरश: आगपाखड केली होती. सहा खासदारांपैकी सर्वाधिक टीकेचा सामना ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांना करावा लागला. सोशल मिडीयावर सामान्य शिवसैनिक त्यांच्यावर अक्षरश: तुटून पडले होते. काल पवनराजे निंबाळकर हत्या खटल्याचा कोर्टाचा निकाल निंबाळकर कुटुंबाच्या विरोधात गेला. शिंदे गटात गेल्यास हा निकाल ओमराजे निंबाळकर यांच्या बाजूने जाईल, अशी चर्चा होती. मात्र, काल निकाल विरोधात गेल्याने ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसला. यानंतर ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा गोंजारण्याचे प्रयत्न सुरु झाले होते. शनिवारी मध्यरात्री ठाकरे गटाचे खासदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी ओमराजे यांच्या पुण्यातील घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. यावेळी या नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली होती. त्याचवेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thakeray) आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातही फोनवरुन बोलणे झाल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांची भूमिका जाणून घेतली. ओमराजे यांचे नेमकं म्हणणं काय आहे हे उद्धव ठाकरेंनी समजून घेतले. विशेष म्हणजे या फोन कॉलवर ओमराजे निंबाळकर यांनी आपण अजूनही ठाकरे गटासोबत असल्याचे उद्धव यांना सांगितले. आपणच मला मोठं केलं आहेय आज मी खासदार आहे, ते पक्षामुळे, तुमच्यामुळे. त्यामुळे मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. मी कार्यकर्त्यांसोबत सगळ्या बाबतीत चर्चा करणार आहे. असे उद्धव ठाकरेंना ओमराजे निंबाळकर यांनी सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे.

Comments are closed.