धक्कादायक! अनैतिक संबंधातून महिलेनं तरुणाच्या तोंडावर ओतले उकळते तेल, तरुणाचा मृत्यू,

लातूर क्राईम न्यूज : लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात धक्कादायक घटना घडली आहे. अनैतिक संबंध आणि जमिनीच्या वादातून महिलेने 24 वर्षीय तरुणाच्या तोंडावर उकळते गोडतेल ओतून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्ञानेश्वरनगर, शेल्हाळ रोड (निडेबन) परिसरात ही घटना घडली. जखमी अवस्थेत उपचार सुरु असताना तरुणाचा मृत्यू झाला आहे. उद्धव मारोती दहीकांबळे असं या तरुणाचं नाव आहे. या घटनेनंतर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आरोपी फरार आहे.

जमीन आणि मालमत्ता नावावर करून घेण्याच्या कारणावरून वाद

उदगीर तालुक्यातील नावंदी येथे राहणारा 24 वर्षीय उद्धव मारोती दहीकांबळे निडेबन येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. उद्धवचे गावातील वंदना तुळशीराम मादळे हिच्यासोबत अनैतिक संबंध होते. तसेच उद्धवच्या वाट्याला येणारी जमीन आणि मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेण्याच्या कारणावरून 12 तारखेला पहाटे या दोघात भांडण झाले. त्यानंतर आरोपी महिलेने त्याच्या तोंडावर उकळते गोडतेल ओतल्याचा सोमोर आले आहे. या हल्ल्यात गंभीर भाजलेल्या उद्धव दहीकांबळे यांच्यावर शासकीय रुग्णालय, लातूर येथे उपचार सुरू होते. आज पहाटे सुमारे साडेचार वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

महिला आरोपी फरार, शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना

उद्धवचे वडील मारोती नरसिंह दहीकांबळे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 417/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103 (1) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आरोपी सध्या फरार असून तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

शेत जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्यची निर्घृण हत्या

सोलापूर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. शेत जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्यची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्ख्या भावांनी आणि भावांच्या मुलांनींच शेतकऱ्याला संपवलं आहे. संजय नागनाथ शिंदे वय 55 असं या शेतकऱ्याचे नाव आहे. आज सकाळी शेतात तलवारीने हल्ला करुन त्यांना संपवण्यात आलं. ही घटना कामती खुर्द परिसरात घडली आहे.

शेतजमिनीच्या वादातून सख्ख्या भावांनी आणि भावांच्या मुलांनी शेतकऱ्याला संपवलं

सोलापूर जिल्ह्यातील कामती खुर्द येथील संजय नागनाथ शिंदे (वय 55) हे आज 22 जून 2026 रोजी सकाळी दुचाकीने आपल्या शेतात गेले होते. तिथे शेतजमिनीच्या वादातून सख्ख्या भावांनी आणि भावांच्या मुलांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. यामध्ये त्यांना जागीच ठार केले, असा आरोप मृताच्या मुलाने केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. संजय शिंदे यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

शेतजमिनीच्या वादातून सख्ख्या भावांनीच भावाला संपवलं, धक्कादायक घटनेनं सोलापूर हादरलं

Comments are closed.