Monsoon Hair Care-पावसाळ्यात केसांची घ्या विशेष काळजी

पावसाळ्यात केसांची काळजी घेणे जरा आव्हानात्मक असते. कारण या दिवसात हवेत आद्रता वाढलेली असते. यामुळे दमट व कोंदट वातावरणाचा केसांवरही परिणाम होतो. मुख्यत पावसाळ्यात केसांत कोंडा होणे, खाज येणे, स्कॅल्प इन्फेक्शन वाढतं. यामुळे पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी त्यासाठी काय करावं ते बघूया.

केस धुणे

पावसाळ्यात आठवड्यातून तीन ते चार वेळा केस धुवावेत. त्यामुळे केसांवर साचलेली धूळ, घाम आणि तेलकटपणा जातो. केस स्वच्छ होतात. पण केस धुण्यासाठी कधीही गरम पाण्याचा वापर करू नये. गरम पाण्यामुळे तुमच्या केसातील नैसर्गिक तेल कमी होते.

कंडिशनर

शॅम्पू केल्यानंतर केसांवर कंडीशनर लावावे. त्यामुळे कोरडे केस मुलायम होतील. मात्र कंडीशनर लावताना केसांची उंची बघून लावावे. उगाचच जास्तीचे कंडीशनर लावू नये.

स्टायलिंग प्रॉडक्ट

मानसूनमध्ये केसांना भलते सलते क्रिम किंवा शॅम्पू, तेल, सीरम लावू नये. त्यामुळे केस तेलकट होतात. त्यापेक्षा नैसर्गिक पद्धतीने केसांची निगा राखावी.

कंगवा
पावसाळ्यात केस गळणे, तुटणे असे प्रकार वाढतात. केसात गुंता होतो. यामुळे केस विंचरण्यासाठी मोठ्या फटींचा कंगवा वापरावा. यादिवसात केसांवर ब्रश वापरु नये.

हिटींग मशीनचा वापर टाळा
केस सेट करण्यासाठी ब्लो ड्रायर, स्ट्रेटनर, आणि कर्लिंग आयरन सारख्या हिटींग मशीनचा वापर आपण करतो. पण या मशीनमुळे केस तात्पुरते सुंदर आकर्षक दिसत असले तरी केसांचे नुकसान मात्र अधिक होते. त्यातच पावसाळ्यात केस सुकवण्यासाठी काहीजण या हिटींग मशीनचा वापर करतात. पण असे करणे चुकीचे असून या मशीनच्या वापरामुळे केसांचा नैसर्गिक सॉफ्टनेस नाहीसा होतो. यामुळे केस हवेतच सुकवावे.

Comments are closed.