मी कधी शिवी दिली हे दाखवा, गद्दारांना गद्दारच म्हटलं पाहिजे, महात्मा कसं म्हणणार? : संजय राऊत
मुंबई : शिदेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी पत्रकारांना शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिल्यानंतर त्यावर आता संजय राऊतांनी (Sanjay Raut) प्रतिक्रिया दिली. राज्यात सध्या धमक्या, खून, हत्या खंडणी यांना ऊत आलं असून त्याला सरकारचं संरक्षण आहे. पत्रकारांना जर धमकी मिळत असेल आणि राज्याचे मुख्यमंत्री हसत हसत ते उडवून देत असेल तर ते गंभीर असल्याचं संजय राऊत म्हणाले. देशभरातील पत्रकारांनी त्याविरोधात आता आवाज उठवावा, असंही ते म्हणाले.
ठाकरेंच्या शिवसेनेतून बंड करत शिंदेंच्या शिवसेनेच प्रवेश केलेल्या खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. यावेळी त्यांनी पत्रकारांना मारहाण करण्याचीही धमकी दिली. त्यांच्याविरोधात आता सर्व स्तरातून रोष व्यक्त केला जात आहे.
यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, “काही वर्षांपूर्वी त्यावेळचे ‘महानगर’चे संपादक निखील वागळे आणि शिवसेना यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यावेळी आम्ही काय त्यांना ठार मारण्याची धमकी दिली नव्हती. पण त्यावेळी देशभरातील पत्रकार शिवसेना भवन समोर आले होते,. पत्रकारांवर हल्ला झाला म्हणून कारवाईची मागणी त्यांनी केली होती. आता ते पत्रकार कुठे गेले? पत्रकार हा या देशाच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, पण केंद्रातले मोदी आणि अमित शाह मानत नाहीत.”
पत्रकारांना दिलेल्या धमकीबाबत मुंबई पोलिसांनी, गृहमंत्र्यांनी कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता कारवाई केली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. कॅमेरासमोर बाँब टाकण्याची भाषा केली जाते, स्मशानात पाठवण्याची धमकी दिली जाते. हे राज्य कलंकित होत आहे, बदनाम होत आहे. आमचा महाराष्ट्र असा नव्हता, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांच्यावरही शिवीगाळ केल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेकडून सातत्याने केला जातो. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, मी जर शिवी दिली असेल तर दाखवा. एखाद्याला शिवी देणं आणि एखाद्याला हत्येची धमकी देणं, यामधील फरक उपमुख्यमंत्र्यांना समजत नसेल तर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांची अक्कल नेमकी कुठे हरवली, त्यासाठी एसआयटी स्थापन करावी.
दारुच्या गुत्त्यावरून हत्या
मी गद्दारांना शिवी दिली. गद्दारांना गद्दारच म्हटलं पाहिजे, त्यांच्यासाठी महात्मा किंवा आचार्य हे पर्यायी शब्द होऊ शकत नाहीत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. त्याचवेळी नाव न घेता संजय राऊत यांनी संजय दिना पाटील यांना इशाराही दिला. कुणी कुणाला ठार मारले आणि कोणत्या कारणावरुन मारलं याचं रेकॉर्ड आमच्याकडे आहे. तो शिवसेनेचा वाद नव्हता, तो दोन दारू गुत्तेदारांचा वाद होता आणि त्यामध्ये हत्या झाली, असा दावा राऊत यांनी यावेळी केला.
पोलीस आयुक्तांवर टीका
यावेळी संजय राऊत यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांवरही टीका केली. ते म्हणाले की, “मुंबईमध्ये कर्तबगार पोलीस आयुक्त आहेत. एखादा लोकप्रतिनिधी असलेला गुंड त्यांना जुमानत नसेल तर त्यांना ते ऐकवा. बिहारमध्ये अशा प्रकारची भाषा केली जाते. आता महाराष्ट्राचा बिहार झालाय अशी परिस्थिती झाली आहे.”
ही बातमी वाचा:
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
Comments are closed.