महायुतीत हे सगळं खपवून घेतलं जाणार नाही, संजय पाटलांच्या वक्तव्यावर फडणवीसांची तीव्र नाराजी
संजय दिना पाटील यांच्यावर देवेंद्र फडणवीस मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या शिवसेनेत दाखल झालेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत वादग्रस्त आणि अर्वाच्य भाषेचा वापर केला. संजय पाटील यांच्या या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर येत संजय दिना पाटील यांना दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितल्याचं म्हटलं, मात्र याच वेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यांबाबत बैठकीत चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांनी संजय पाटील यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली, याशिवाय शिवसेनेच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या वक्तव्यांचा पाढा वाचत, महायुतीत हे खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
खासदाराला कठोर शब्दात तंबी द्या: देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत संजय दिना पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला घेऊन दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. संजय दिना पाटील यांनी केलेल्या वक्तव्याची दोन्ही नेत्यांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लोकप्रतिनिधींनी माध्यमांशी बोलताना तारतम्य बाळगावं, अशी भूमिका मांडली. माध्यमांशी अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या खासदाराला कठोर शब्दात तंबी द्या, असं म्हणत फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. सरकारची प्रतिमा मलिन करणाऱ्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा संजय पाटील यांच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याची माहिती आहे.
सेनेच्या नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या वक्तव्याचा मुख्यमंत्र्यांनी वाचला पाढा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीव्र नाराजी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंतच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या मंत्र्यांच्या वक्तव्यांचा एकनाथ शिंदे समोर पाढा वाचला आणि सोबतच महायुतीमध्ये हे सगळं खपून घेणार नाही अशी सूचना सर्व आमदार खासदारांना द्यावी, असं देखील सांगितलं.
संजय दिना पाटील हे आता महायुतीचे खासदार आहेत. आता यापुढे कोणत्याही खासदार, आमदार मंत्र्यांचे कोणत्याही प्रकारचे वक्तव्य महायुती सहन करणार नाही असं देखील फडणवीस यांनी नमूद केलं. भविष्यात अशी घटना घडली नाही पाहिजे यासाठी पक्षश्रेष्ठींनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले.
संपूर्ण प्रकरणात आता एकनाथ शिंदे त्यांच्या नवीन पक्षप्रवेश केलेल्या वाचाळवीर खासदाराबाबत या प्रकरणात काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
संजय दिना पाटील काय म्हणाले?
खासदार संजय दिना पाटील पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरताना म्हणाले की तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हाला मारुन पाठवेन. हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा, तुम्ही उगाच माझ्या गां#% बोटं घालताय, परत आलात तर मारुन पाठवेन. हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय, तुम्हाला करायचंय ते करा, अशी भाषा संजय दिना पाटील यांनी वापरली.
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
Comments are closed.