सियाचा भाऊ आणि बॉयफ्रेंड हे खास मित्र, केतनला संपवण्याचा प्लॅन त्याला माहिती; वडिलांचा संशय

मुंबई : पुण्यातील लोहगड हत्या प्रकरणामध्ये मयत केतन अग्रवालच्या (Ketan Agrawal) वडिलांनी आता नवा संशय व्यक्त केला आहे. सियाचा भाऊ साहिल आणि तिचा बॉयफ्रेंड हे खास मित्र होते, त्यामुळे केतनच्या (Ketan Agrawal) हत्येचा प्लॅन हा आणखी काही जणांना असण्याचा संशय आहे, असं विशाल अग्रवाल म्हणाले. विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली.

पुण्यातील लोहगडवर (Lohagad Case) उद्योगपती असलेल्या केतन अग्रवालची 18 जून रोजी हत्या करण्यात आली. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी त्याला गडावरून ढकलून देऊन हत्या केल्याचं समोर आलं. या प्रकरणात आता सियाच्या भावाची, म्हणजे साहिल गोयलची चौकशी करण्यात येत आहे. केतनच्या हत्या प्रकरणात सिया आणि चेतन यांच्याबरोबरच अजून काही लोकांचा हात असण्याची शक्यता विशाल अग्रवाल यांनी व्यक्त केली.

Ketan Agrawal Case : विग लावायचा हे हत्येचं कारण नाही

केतन डोक्याला विग वापरायचा ही माहिती लग्नाच्या आधी सियाला आणि तिच्या कुटुंबाला देण्यात आली होती. परंतु हत्या करण्याचं हे काही कारण असू शकत नाही, असं विशाल अग्रवाल म्हणाले. लग्नासाठी नकार देणं हे सियासाठी खूप सोपं होतं, त्यासाठी तिने केतनची हत्या करण्याची गरज नव्हती, असं विशाल अग्रवाल म्हणाले.

दरम्यान, केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता आणखी काही लोकांची चौकशी करण्यात येत आहे. सियाचा भाऊ साहिल याचीही चौकशी करण्यात येत आहे. साहिल आणि आरोपी चेतन चौधरी हे खास मित्र असल्याने या प्रकरणात आणखी काही लोकांचा समावेश असावा असा संशय विशाल अग्रवाल यांनी व्यक्त केला.

Lohagad Crime Case : मुख्यमंत्र्यांची भेट

या प्रकरणात आपल्याला न्याय मिळावा यासाठी विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून दोषींना लवकरात लवकर शिक्षा देण्याचं आश्वासन दिलं असल्याचं विशाल अग्रवाल म्हणाले. तसेच आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी विशाल अग्रवाल यांनी केली.

ही बातमी वाचा:

Comments are closed.