मोहरमच्या मिरवणुकीत पेनकिलर सांगून उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्या; भायखळ्यात भयंकर घटना… मोठ्या घातपाताचा प्लॅन होता

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भायखळ्यात मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान मोठा अनर्थ टळला. पुण्याच्या 39 वर्षीय तरुणाने या मिरवणुकीत वेदनाशामकच्या नावाने उंदीर मारायच्या गोळ्या वाटल्याने खळबळ उडाली आहे. भायखळा पोलिसांनी त्या माथेफिरू तरुणाला ताब्यात घेऊन तब्बल 14 हजार 900 झिंक फॉस्फेट मिश्रित गोळ्यांचा साठा जप्त केला आहे. त्याने असे का केले ते समजू शकले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मोहरमनिमित्त भायखळय़ाच्या अंजीर वाडीतून सीताफळवाडी मार्गे मिरवणूक काढण्यात आली होती. त्या मिरवणुकीत एक तरुण ‘पेनकिलर’च्या नावाने गोळय़ा वाटत होता. ही बाब भायखळा पोलिसांच्या निदर्शनास येताच पोलिसांनी त्याला हटकले व विनापरवाना अशा गोळय़ा वाटू नको असा समज देत त्याला जाऊ देण्यात आले. दरम्यान मिरवणुकीत सहभागी झालेल्या सलमान सय्यद नावाच्या व्यक्तीला उलटय़ा व पोटदुखीचा त्रास झाल्याचे पोलिसांना कळताच त्यांनी पेनकिलरच्या नावाने मिरवणुकीत गोळय़ा वाटणारा फय्याज प्रेमजी (39) या तरुणाला डोंगरीतून ताब्यात घेतले. त्याच्याकडे गोळय़ांबाबत कसून चौकशी करता त्याने त्या गोळय़ा उंदीर मारायच्या असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून झिंक फॉस्फेट हे उंदीर मारायचे औषध असलेल्या 14 हजार 900 गोळ्या जप्त केल्या. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता फय्याजने 50 किलो झिंक फॉस्फेट आणि 30 हजार कॅप्सूल ऑनलाइन मागवल्या होत्या. ते औषध त्याने कॅप्सूलमध्ये भरून त्या गोळ्या ‘पेनकिलर’ म्हणून वाटल्या. डोंगरीत त्याने एका हॉटेलमध्ये खोली घेतली होती. तेथेच त्याने कॅप्सूलमध्ये औषध भरून मग त्या गोळय़ा मिरवणुकीत वाटल्या असाव्या असा पोलिसांना संशय आहे.

मोहरमच्या मिरवणुकीला टार्गेट करण्यासाठी हे कृत्य केल्याचे त्याने चौकशीत सांगितले. जास्तीत जास्त लोकांना हानी पोहचवण्याचा त्याचा प्रयत्न होता. परंतु असे करण्यामागे त्याचा नेमका उद्देश काय होता, ते समजू शकले नाही. भायखळा पोलीस अधिक तपास करत आहेत.

मोठा अनर्थ टळला

भायखळा पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी वेळीच फय्याजला गोळ्या वाटण्यापासून रोखल्याने फार कोणाला त्रास होऊ शकला नाही. दरम्यान या प्रकरणात कोणतीही दहशतवादी लिंक आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलीस सर्व यंत्रणांच्या मदतीने तपास करत आहेत.

आरोपी फैयाज प्रेमजीची कसून चौकशी

आरोपी फय्याज प्रेमजी हा मूळचा पुण्यातील विमाननगर येथील असून अलीकडच्या काळात तो इराण आणि इराकला जाऊन आला आहे. तेथे त्याने एक एक महिना काम केले. पुण्यात त्याच्या वडिलांची पेन्टची कंपनी असून तेथेच तो वडिलांना मदत करतो. बीबीएमचे शिक्षण घेतलेल्या फैयाजने उंदीर मारायच्या गोळय़ा का वाटल्या हे समजू शकलेले नाही. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

Comments are closed.